“नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेण्याच्या राज्य शासनाचा निर्णय लोकशाहीला मारक आहे. सध्या दोन जणांचे मंत्रीमंडळ असून दोघे जण महाराष्ट्राचे मालक झाले आहेत.”, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी केली. पुण्यातील धनकवडी येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मंत्रिमंडळाचा विस्तार का केला जात नाही? –
यावेळी अजित पवार म्हणाले, “सरकार बदलल्यानंतर आम्ही काहीतरी करतोय हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. दोघे जण महाराष्ट्राचे मालक झाले असून सगळा भार यांच्या खांद्यावर आहे. आपत्ती व्यवस्थापनाला संचालक नाही. अनेकवेळा पूर, ढगफुटी अशी संकटे येतात त्यावेळी, मदत खात्याला सचिव महत्त्वाचा असतो. पण सद्य:स्थितीत सचिव नाही. हे या सरकारचे अपयश आहे. १६५ आमदारांचे पाठबळ असल्याचे सांगत असताना मंत्रिमंडळाचा विस्तार का केला जात नाही?” असा सवाल त्यांनी केला.
तर पेट्रोल १७ रुपये स्वस्त झाले असते –
तसेच, “महाविकास आघाडीने सत्तेत असताना गॅसवरचा कर कमी केला होता, तेव्हा हेच लोक आमच्याकडे ५० टक्के कर माफ करण्याची मागणी करत होते. मग आत्ता का नाही केली?, ती केली असती तर पेट्रोल १७ रुपये स्वस्त झाले असते. निर्णय घेताना पळवाट काढण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.”, असा आरोप अजित पवार यांनी केला.
आत्तापासून ओढा-ओढी असेल तर महाराष्ट्राचे कसे होईल? –
“अडीच वर्षात आम्ही कधीही कोणाचा ध्वनिक्षेपक खेचला नाही, ही तर सुरुवात आहे. आत्तापासून ओढा-ओढी असेल तर महाराष्ट्राचे कसे होईल? असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला. आमदार दीपक केसरकरांनी वक्तव्य करताना ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असे करू नये.”, असे म्हणत “राष्ट्रपतिपदासाठी पाठिंबा देणे हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असून तो त्यांचा अधिकार आहे.” असेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले.