कसबा पोलीस चौकीजवळील दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. एटीएमच्या सीसीटीव्ही चित्रीकरणावरून या दोघांना पकडण्यात आले आहे. दारूच्या नशेत असताना पैसे न निघाल्यामुळे दोघांनी एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.
जयप्रकाश ऊर्फ बंटी कन्हैयालाल नारायण शर्मा (वय ३१, रा. मंत्री निकेतन, दापोडी, मूळ- जयपूर) आणि विनायक सुरेश जाधव (वय २६, रा. कसबा पेठ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोन दिवसांपूर्वी या दोघांनी पहाटे पावणेचार वाजता अ‍ॅक्सीस आणि डीसीबी बँकेचे एटीएम फोडून पैसे चौरण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले, की एटीएम फोडताना चित्रीकरण पोलिसांना मिळाले होते. ते चित्रीकरण आणि फोटो माध्यमात आले. फरासखाना पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुनील पवार यांना खबऱ्याकडून या चित्रीकरणातील शर्मा याची माहिती मिळाली. त्यानुसार तो तळेगाव या ठिकाणी असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. मात्र, त्या ठिकाणाहून तो निघून गेल्याचे समजले. पण, त्या ठिकाणी शर्माच्या शिवाजीनगर येथील भावाचा पत्ता मिळाला. त्या ठिकाणी जाऊन चित्रीकरण दाखविल्यानंतर शर्माच्या भावाने चित्रीकरणातील व्यक्ती त्याचा भाऊच असल्याचे सांगितले. दरम्यान, माध्यमांमध्ये फोटो छापून आल्यामुळे दोघेही घाबरले होते. शर्मा हा जपूरला जाणार होता. तर, जाधव कोकणात महाडला पळून जाणार होते. ही माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षकल गीता बागवडे व कर्मचारी यशवंत ओंबासे, शंकर संपते, हर्षल शिंदे आणि बामगुडे यांच्या पथकाने शर्माला पुणे रेल्वे स्टेशन येथे पकडले. तर, जाधवला कसबा पेठ येथेच पकडले. या दोघांना ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
शर्मा हा जयपूर येथे एका ज्वेलरीच्या कंपनीत कामाला आहे. पंधरा दिवसांपूर्वी पुण्यात आला आहे. त्याचे वडील पूर्वी कसबा पेठेत राहण्यास असल्यामुळे जाधव व त्याची ओळख होती. घटनेच्या दिवशी दोघेही रात्री एका ठिकाणी दारू पिण्यास गेले होते. पहाटेच्या बसने शर्मा दापोडीला जाणार होता. त्याला सोडण्यासाठी जाधव आपल्या मोटारीवर जात होते. मात्र, शर्माकडे पैसे नसल्यामुळे जाधव व ते अ‍ॅक्सीस बँकेच्या एटीएममध्ये गेले. पण, जाधव याने वटविलेला धनादेश न वटल्यामुळे खात्यात पैसे नव्हते. त्यामुळे एटीएममधून पैसे न निघल्यामुळे त्यांनी ते फोडून पैसे चोरण्याचे ठरविले. पण तेथे सुरक्षा रक्षक असल्यामुळे त्यांनी शेजारील डीसीबी बँकेचे एटीएम दगड आणि विटाने फोडण्याचा प्रयत्न केला. पण, ते फुटले नाही. त्यामुळे परत येऊन त्यांनी लोखंडी पाइपने अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम फोडले, असे बर्गे यांनी सांगितले.
पन्नास टक्के एटीएमला सुरक्षारक्षक नाही
फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ३२ एटीएम आहेत. यातील पन्नास टक्के एटीएम जवळ सुरक्षारक्षक नसल्याचे दिसून आले आहे. त्याच बरोबर रिझर्व बँकेच्या नियमानुसार पारदर्शक काच असणे गरजेचे असताना ते आढळून आलेले नाही. त्यामुळे ज्या बँकेच्या एटीएमवर सुरक्षाव्यवस्था कमी असल्याचे आढळून आले आहे. त्या बँकाना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे दोन ते पाच या काळात चार पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून गस्त वाढविण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले.