तांत्रिक बिघाड करून नागरिकांची फसवणूक

नोटाबंदीनंतर शहरातील वेगवेगळ्या भागातील एटीएम केंद्रांच्या बाहेर रांगा लागल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. चंदननगर भागात एटीएमच्या रांगेत उभे असलेल्या नागरिकांची फसवणूक केली जात होती. ही फसवणूक करणाऱ्या उत्तरप्रदेशमधील दोन भामटय़ांना पोलिसांनी पकडले आहे. एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून पैसे काढायला आलेल्या व्यक्तीला मदतीचा बहाणा करायचा. त्यानंतर पिन क्रमांक लक्षात ठेवून त्या व्यक्तीला दुसरेच कार्ड द्यायचे आणि लगोलग चोरलेल्या कार्डचा वापर करून खरेदी करायची, अशा पद्धतीने या भामटय़ांनी नागरिकांना गंडवल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून सात एटीएम कार्डही जप्त करण्यात आली आहेत.

सय्यद कमालउद्दीन खान (वय २५) आणि त्याचा साथीदार मोहम्मद झिसम सिद्धीकी (वय २६, दोघे सध्या रा. गणेशनगर, वडगांव शेरी, मूळ रा.  तिलोरी, लालगंज, उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या भामटय़ांची नावे आहेत. गेल्या पंधरवडय़ात चंदननगर भागात एटीएम केंद्रात पैसे काढणाऱ्या नागरिकांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले होते. अशा प्रकारचे चार-पाच तक्रारअर्ज चंदननगर पोलीस ठाण्यात आले होते. त्यामुळे गेला आठवडाभर तपासपथकातील पोलीस चंदननगर भागातील एटीएम केंद्रांबाहेर पाळत ठेवून होते. पोलीस हवालदार अविनाश शिवशरण आणि बालाजी शिरपुरे यांना खबऱ्याने खान आणि त्याचा साथीदार सिद्धीकी यांच्या संशयास्पद हालचालींची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी एटीएम केंद्राबाहेर  खानला पकडले. पसार होण्याच्या तयारीत असलेल्या खानला पाठलाग करून पकडण्यात आले, अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाथ्रुडकर यांनी दिली.खानची झडती घेण्यात आली, तेव्हा त्याच्याकडून तीन एटीएम कार्ड जप्त केली. त्याचा साथीदार सिद्धकीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कार्डचा वापर करून खान व त्याच्या पत्नीचे आठवडय़ापूर्वी उत्तरप्रदेशात जाण्यासाठी विमान प्रवासाचे तिकीट काढले गेले होते.

फसवणूक करण्याची पद्धत

नोटाबंदीनंतर शहरात अनेक भागात एटीएम केंद्राबाहेर लागलेल्या रांगेत खान थांबायचा. उत्तरप्रदेशातील एका साथीदाराने त्याला एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड कसे करायचे, याची माहिती पुरवली आहे. एटीएम मशीनमधून पैसे काढताना खान स्वत:च्या कार्डचा वापर करायचा आणि यंत्रातील एक विशिष्ट बटण दाबून त्यात तांत्रिक बिघाड करायचा. नंतर रांगेत मागे थांबलेल्या व्यक्तीला एटीएम यंत्रात बिघाड झाल्याची बतावणी तो करायचा. त्यानंतर रांगेत मागे थांबलेल्या व्यक्तीला तो पैसे काढा, असे सांगायचा. त्या व्यक्तीला पैसे काढण्यास अडचण आल्यानंतर खान त्याला मदत करण्याचा बहाणा करायचा. त्या व्यक्तीचा पासवर्ड लक्षात ठेऊन पैसे काढण्याच्या गडबडीत असलेल्या त्या व्यक्तीचे एटीएम कार्ड तो नकळत लंपास करायचा. अशा वेळी तो जवळ बनावट कार्ड ठेवायचा. जवळचे हे कार्ड तो त्या व्यक्तीला देऊन तेथून पसार व्हायचा. ज्याचे कार्ड चोरले असेल त्याचा पासवर्ड लक्षात ठेवून तो नजीकच्या सराफी दुकानात तसेच मॉलमधून खरेदी करायचा.

चंदननगर भागात पकडलेल्या भामटय़ांनी शहरात एटीएम केंद्रांमध्ये आणखी काही फसवणुकीचे गुन्हे केल्याचा संशय आहे. अशी फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी चंदननगर पोलीस ठाणे (०२०- २७०१२३२१) किंवा पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल झांजुर्णे (मोबाईल क्रमांक- ९५९४९४२२६२) यांच्याशी संपर्क साधावा.

अनिल पाथ्रुडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक