Pune News : राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने पुण्याच्या कोंढवा येथील अवैध टेलिफोन एक्सचेंवर छापा टाकला आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी नौशाद अहमद सिद्दीकी (३२) नामक व्यक्तीला अटक केली असून तो भिवंडी येथील नागरिक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे टेलिफोन एक्सचेंज सुरू असून याद्वारे राष्ट्रविरोधी काम होत असल्याचा संशय दहशतवाद विरोधी पथकाने व्यक्त केला आहे.
‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, दहशतवाद विरोधी पथकाने एका परिपत्रकाद्वारे या कारवाईची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी नौशाद अहमद सिद्दीकी हा आठ महिन्यांपूर्वी भिवंडीतून पुण्यात आला आला होता. तो कोंढवा परिसरातील मीठा नगर भागत एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्या ठिकाणीच त्याने अवैध टेलिफोन एक्सचेंज सुरु केले होते.
हेही वाचा – पिंपरी- चिंचवड: गणपती मंडळांनी बळजबरी वर्गणी मागितल्यास होणार कडक कारवाई; पोलीस आयुक्त चौबे यांचा इशारा
गुप्त माहितीच्या आधारे दहशतविरोधी पथकाची कारवाई
दरम्यान, पुण्यात अशाप्रकारचे अवैध टेलिफोन एक्सचेंज सुरु असल्याची गुप्त माहिती दहशतविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे या पथकांने गुरुवारी मीठा नगर भागातील संबंधित अपार्टमेंटवर छापा टाकला. या कारवाईत पथकाने विविध कंपन्यांच्या सात सीम बॉक्ससह ३ हजार ७८८ सीमकार्ड, ९ वायफाय राऊटर, एक एंटीना, इर्न्वटर आणि एक लॅपटाप, असा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपी नौशादला अटक केली असून त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आरोपीला एटीएस कोठडी सुनावली आहे. तसेच अशाप्रकारे अवैध टेलिफोन एक्सचेंज चालवण्यामागे नेमका काय उद्देश होता, याचा तपास एटीएसद्वारे केला जातो आहे.
आरोपी हा जास्त शिकलेला नसून केवळ पैशांसाठी त्याने हे टेलिफोन एक्सचेंज सुरु केल्याचं प्राथमिक तपातून पुढे आल्याचं एटीएसने म्हटलं आहे. याशिवाय बंदी असतानाही आरोपीने सीमबॉक्स आणि तीन हजारापेक्षा जास्त सीमकार्ड कुठून खरेदी केले, हा आर्थिक व्यवहार कसा झाला, याचा तपास सुरू असल्याची माहितीही एटीएसच्या पथकाने दिली आहे. संपूर्ण प्रकरणात काही विदेशी नागरिकांचाही समावेश असू शकतो, अशी शक्यता एटीएसने वर्तवली आहे.
हेही वाचा – पुणेकर हवाई प्रवाशांना खुशखबर! पुणे विमानतळाबाबत मुरलीधर मोहोळ यांची मोठी घोषणा
महत्त्वाचे म्हणजे मागच्या काही दिवसांपासून दहशतवाद विरोधी पथकाद्वारे देशभरात अशा प्रकारची कारवाई केली जात आहे. काही दिवसांपूर्वी चेन्नईमध्येही अशाच प्रकारे अवैध टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकण्यात आला होता. त्यावेळीही लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र, पुण्यात अशी कारवाई होण्याची पहिलीच कारवाई असल्याची माहिती आहे.