डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा गुन्हा कबूल करण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारिया यांनी आपणाला पंचवीस लाख रुपयांचे आमिष दाखविले, असा खळबळजनक आरोप या गुन्हयात अटक असलेले मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांनी मंगळवारी न्यायालयात केला. या गुन्ह्य़ाच्या तपासासाठी राजकीय दबाव असल्यामुळे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या सांगण्यावरून या गुन्ह्य़ात अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी न्यायालयास सांगितले. त्यावर न्यायालयाने त्यांना हा गुन्हा तपासावर असून तुमच्या विरुद्ध पुरावा गोळा झाला नाही, तर पोलीस आरोपपत्र दाखल करणार नाहीत, असे त्यांना सांगितले. दरम्यान, या गुन्ह्य़ात दोघांना २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. शेख यांनी दिले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा २० ऑगस्ट रोजी पुण्यात गोळ्या घालून खून करण्यात आला. या प्रकरणात शस्त्रास्त्र पुरविल्याच्या आरोपावरून नागोरी आणि खंडेलवाल यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली होती. खंडेलवाल याच्याकडे मुंब्रा पोलिसांना सापडलेले पिस्तूल आणि डॉ. दाभोलकर यांना लागलेल्या गोळ्या यांच्यात साम्य असल्याचा बॅलेस्टिकचा अहवाल आला आहे. त्यानुसार न्यायालयाच्या परवानगीने दोघांना ठाणे मध्यवर्ती कारागृहातून अटक केली. दोघांना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले. सहायक सरकारी वकील माधव पौळ यांनी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. या खुनामागील कारणाचा शोध घ्यायचा आहे. त्यांचे साथीदार कोण आहेत. गुन्ह्य़ात वापरलेली मोटारसायकल हस्तगत करायची असून तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद पौळ यांनी केला. त्यानंतर नागोरीचे वकील अॅड. बी. ए. अलुर यांनी आरोपींना न्यायालयास काही सांगायचे असल्याचे सांगितले. नागोरी आणि खंडेलवाल यांनी न्यायालयात त्यांचे म्हणणे सांगितले.
नागोरी याने सांगितले, की एटीएसने आम्हाला ताब्यात घेऊन ४५ दिवस चौकशी केली आहे. मात्र, त्यामध्ये काहीच निष्पन्न झाले नाही. जबरदस्तीने आमची नार्को आणि लाय डिटेक्टर चाचणी घेण्यात आली. त्याचबरोबर ‘थर्ड डिग्री’चा वापर करून छळवणूक करण्यात आली. पोलिसांना चार महिन्यांपूर्वी बॅलेस्टिकचा अहवाल मिळाला आहे. मग त्या वेळी का अटक केली नाही. मुंब्रा पोलिसांनी २० ऑगस्ट रोजी सकाळी सव्वादहा वाजता खंडणीच्या गुन्ह्य़ात अटक केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी दोन खोटय़ा खुनाच्या गुन्ह्य़ात अटक करून आमच्याकडे दाभोलकर प्रकरणाची चौकशी केली आहे. विनाकारण खोटय़ा गुन्ह्य़ात अडकविले जात आहे. पुण्यातील आणखी किती गुन्ह्य़ात संशयित म्हणून अटक केले जाणार आहे. आम्ही दोषी असलो तर चौदा दिवस पोलीस कोठडी द्यावी. तसेच, पोलिसांबरोबर सर्वाचीच नार्को चाचणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर न्यायालयाने त्यांना तुमच्या विरुद्ध पुरावे नाही गोळा करता आले, तर तुमच्यावर आरोपपत्र दाखल केला जाणार नाही.
सर्व आरोप खोटे- डॉ. सोळुंके
नागोरी व खंडेलवाल यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. त्यांना कोणत्याही दबावाखाली अटक केलेली नसून बॅलेस्टिक अहवालावरून त्यांना अटक केली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर प्रत्येक जण आरोप करीत असतो. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप खोटे आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त डॉ. शहाजी सोळुंके यांनी दिली.