पिंपरी : स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सुरु असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मोटारीची दिव्यांग व्यक्तीने काच फोडली. महापालिका प्रशासन दिव्यांग व्यक्तींना त्रास देत असल्याने मोटारीची काच फोडल्याचे अजय गायकवाड यांनी सांगितले. स्वातंत्र्य दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीत झाल्यानंतर महाराष्ट्र गीत सुरू होते. त्याचवेळी अजय गायकवाड यांनी काटीच्या सहाय्याने आयुक्त सिंह यांच्या मोटारीची काच फोडली. पोलिसांनी तत्काळ गायकवाड यांना ताब्यात घेतले. चालकाने तत्काळ मोटार हलविली. ध्वजारोहण सुरू असताना घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता. आयुक्त सिंह हे पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दुसऱ्या मोटारीने रवाना झाले. 'अ' क्षेत्रिय अधिकारी सुचेता पानसरे यांना महापालिकेत बोलवून घेण्यात आले आहे. हे ही वाचा. पुणे : स्वातंत्र्यदिनाची अनोखी भेट; गहाळ झालेले ५३ मोबाइल संच परत; तक्रारदारांना दिलासा हे ही वाचा. राज्यात नव्या खासगी शाळा सुरू करण्यावर आता नियंत्रण; बृहद् आराखडाच तयार होणार अजय गायकवाड म्हणाले, की महापालिका प्रशासनाकडून दिव्यांग व्यक्तींना त्रास दिला जातो. मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत. मागील चार वर्षांपासून रमाबाई आवास योजनेत घर मागत आहे. परंतु, घर देण्यास टाळाटाळ केली जात आहे. अधिकारी टोलवाटोलवी करत आहेत. टपरीवर दोनवेळा अतिक्रमण कारवाई केली. याबाबत विचारले असता अ क्षेत्रिय अधिकारी सुचेता पानसरे या आयुक्तांनी दिव्यांग व्यक्तींना त्रास द्यायला सांगितले आहे असे उत्तर देतात. आम्हालाही देशाचा अभिमान आहे. परंतु, प्रशासन बहिरे झाले आहे. त्यामुळे आज स्वातंत्र्यदिनी हे पाऊल उचलले आहे. पोलिसांनी दालनात नेऊन मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला.