पुणे : डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्यावर होणारे हल्ले ही वैद्यकीय वर्तुळाच्या दृष्टीने नेहमीच चिंतेची बाब राहिली आहे, मात्र करोनासारख्या अत्यंत कसोटीच्या काळातही डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना सतत हिंसाचाराच्या अनुभवांना सामोरे जावे लागले आहे. जागतिक वैद्यकीय संघटनेने (वल्र्ड मेडिकल असोसिएशन) याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेस, इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस, इंटरनॅशनल हॉस्पिटल फेडरेशन आणि वल्र्ड मेडिकल असोसिएशन यांच्यातर्फे मे ते जुलै २०२१ दरम्यान करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणात प्रामुख्याने करोना साथरोग सुरू झाल्यानंतरच्या काळात वाढलेल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत अभ्यास करण्यात आला. साथरोगासारख्या आव्हानात्मक काळातही वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना मोठय़ा प्रमाणात हिंसाचाराच्या घटनांना तोंड द्यावे लागल्याचे जगभरातील सहभागी व्यक्तींनी सांगितले. डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, रुग्णवाहिका कर्मचारी, चालक यांचा यामध्ये समावेश आहे.

जगातील सर्वच देशांतील कर्मचारी नेहमीच भीतीच्या छायेखाली वैद्यकीय सेवा देतात, मात्र करोना काळही याला अपवाद ठरला नाही. उलट, अशा घटनांमध्ये वाढच झाल्याचे निरीक्षण या सर्वेक्षणात नोंदवण्यात आले आहे. हिंसाचारासारख्या घटनांमध्ये आक्रमक होणारे मुख्य घटक हे सहसा रुग्णांचे नातेवाइकच असल्याने अशा घटना रोखण्यासाठी रुग्ण-नातेवाईक आणि कर्मचारी यांच्यातील परस्पर संबंध आणि संवाद सुधारण्यासाठी प्रयत्न, जनजागृती या बाबी आवश्यक असल्याचे या सर्वेक्षणातून अधोरेखित करण्यात आले आहे.

वैद्यकीय सेवेतील कर्मचारी आणि व्यक्ती यांच्यावर हल्ले होण्याचे प्रमाण जगभरामध्ये लक्षणीय आहे. करोना काळाआधीपासून डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण सुमारे ९१ टक्के आहे. त्यामध्ये करोना काळात सुमारे ९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने शाब्दिक हल्ले, धमकी, शारीरिक हल्ला, शस्त्र दाखवणे, रुग्णालयांमध्ये तोडफोड, नुकसान करणे, चोरी, जीवघेणे हल्ले किंवा काही वेळा प्रत्यक्ष खुनी हल्ले अशा अनेक प्रकारच्या हिंसाचारांची नोंद करण्यात आली आहे. बहुतांश वेळा हल्लेखोर किंवा हिंसाचार करणाऱ्या व्यक्ती या प्रत्यक्ष रुग्ण किंवा रुग्णांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारातील सदस्यच असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.