पुणे : वडिलांना जेवणाचा डबा देऊन घरी जात असलेल्या सात वर्षांच्या बालिकेला धमकावून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना ताडीवाला रस्ता भागात घडली. बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बंडगार्डन पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

याबाबत बालिकेच्या वडिलांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली अहो. आरोपीच्या विरोधात अपहरण, विनयभंग, धमकावणे तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ताडीवाला रस्ता भागात हातगाडीवर व्यवसाय करतात. त्यांची सात वर्षांची मुलगी जेवणाचा डबा देण्यासाठी आली होती. डबा देऊन ती घरी परतत असताना एकाने तिला अडवून धमकावले.

आरोपीने रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या मोकळ्या जागेत बालिकेला नेले आणि जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली. मोकळ्या जागेत एक खासगी कार्यालय असून ते बंद आहे. आरोपीने बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा केला. त्यामुळे आरोपी घाबरला. त्यानंतर बालिका तेथून पळाली आणि तिने या घटनेबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक शिल्पा लंबे तपास करत आहेत.