लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : कौटुंबिक वादातून दोन महिलांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सहकारनगर, कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चारित्र्याचा संशय, तसेच कौटुंबिक वादातून एकाने पत्नीचाी गळाचा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सहकारनगर भागातील तळजाई वसाहतीत घडली. याप्रकरणी सत्यवान अनिल मोहिते (वय २६, रा. शेळगाव, ता. इंदापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मोहितेच्या पत्नीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहिते पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. कौटुंबिक वादातून तिचा छळ करत होता. २४ ऑगस्ट रोजी त्याने पत्नीला मारहाण केली. गळा दाबल्याने पत्नी बेशुद्ध पडली. या घटनेनंतर मोहिते घराला बाहेरून कडी लावून पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.
आणखी वाचा-लष्करी रुग्णालयात नोकरीच्या आमिषाने ४९ लाखांची फसवणूक
दुसऱ्या एका घटनेत नांदण्यास नकार देणाऱ्या पत्नीवर चाकूने वार करण्यात आल्याची घटना अप्पर इंदिरानगर परिसरात घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी राजवली हरुण मुलाणी (रा. शहाजी नगर. बावडा, ता. इंदापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पत्नीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारादर महिला वर्षभरापासून वेगळी राहत होती. इंदिरानगर परिसरातील नातेवाईकांच्या घरात ती भाड्याने राहत होती. मुलाणी पत्नीला नेण्यासाठी आला होता. तेव्हा पत्नीने त्याच्याबरोबर नांदण्यास नकार दिला. त्याने पत्नीवर चाकूने वार केले. पोलिस उपनिरीक्षक़ रविंद्र गोडसे तपास करत आहेत.