पुणे : केरळ, कर्नाटकसह इतर ठिकाणचा हापूस आंबा ‘कोकण हापूस’ म्हणून विक्री करण्याच्या घटना पुण्यासह राज्यातील अन्य महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये घडल्यामुळे यापुढे आंब्यासह सर्व जीआय फळांच्या विक्रीबाबत बाजार समित्यांनी सतर्क राहावे. जीआयच्या मानांकन असलेल्या राज्यातील फळांच्या विक्रीमध्ये शेतकरी आणि ग्राहकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होता कामा नये, अशा सक्त सूचना पणन संचालकांनी राज्यातील बाजार समित्यांना दिल्या आहेत.

 पणन संचालनालयाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, ‘‘राज्यातील एकूण २६ कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. हे मानांकन मिळालेली फळे विशिष्ट दर्जाची, रंगाची, चवीची, वासाची असतात. अशा दर्जा आणि वेगळेपण जपणाऱ्या फळांचे अनधिकृत उत्पादनांपासून, भेसळ होण्यापासून आणि रास्त किमतीपेक्षा कमी किंमत मिळण्यापासून संरक्षण केले पाहिजे.

जीआय उत्पादन घेणाऱ्या आणि नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फायदा मिळाला पाहिजे. त्यासाठी इतर ठिकाणच्या शेतीमालाची भेसळ कोणत्याही परिस्थितीत रोखली पाहिजे. बाजार समित्यांनी ज्या ठिकाणांहून शेतीमाल, फळे बाजारात येतात. त्याच ठिकाणची म्हणून विक्री होईल, अशी व्यवस्था निर्माण करावी. बाजार समित्यामधील गाळेधारक, अडते, व्यापारी यांना सक्त सूचना द्याव्यात. या बाबत कोणतीही फसवणूक होत असल्यास संबंधितांवर महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी.’’

पुण्यात ४० पेटय़ा जप्त

‘कोकण हापूस’मधील भेसळ, फसवणूक रोखण्यासाठी पणन संचालक विशेष आग्रही आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत केरळ, कर्नाटकमधून आलेला हापूस ‘कोकण हापूस’ म्हणून विक्री केला जात असल्याचे निदर्शनास आले होते. सुमारे ४० पेटय़ा जप्त करून संबंधितांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. अशा घटना दरवर्षी घडतात. बाजार समितीत देशभरातून शेतीमाल येत असल्यामुळे सर्व आवकेवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. मात्र, यंदा पणन संचालकांनी सक्तीच्या सूचना दिल्याने किमान कोकण हापूसमधील भेसळ रोखली जाईल आणि ग्राहक आणि शेतकऱ्यांची फसवणूक रोखली जाईल, अशी अपेक्षा केली जात आहे.

‘कोकण हापूस’ या नावाने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी, शेतकरी संस्थांनी सजग राहिले पाहिजे. त्यासाठी विशिष्ट प्रकारे पॉकिंग केले पाहिजे. क्यूआर कोड तयार करून घेऊन, तो कोड आंब्यांच्या पेटय़ांवर लावला पाहिजे. असे केल्यास शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ होईल, शिवाय ग्राहकांचीही फसवणूक टाळली जाईल. 

– सुनील पवार, पणन संचालक