महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सार्वजनिक कामावर असणाऱ्या मजुरांची उपस्थिती आता ऑनलाइन पद्धतीने नोंदविली जात आहे. त्याकरिता खास मोबाइल उपयोजन (ॲप) तयार करण्यात आले आहे. हा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावात पथदर्शी म्हणून राबविला जात असून तो यशस्वी झाला आहे.
महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमाची १९७७ पासून महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू झाली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र या योजने अंतर्गत केंद्र शासन प्रत्येक कुटुंबास १०० दिवसांच्या रोजगाराची हमी देते आणि त्यासाठी मजुरीच्या खर्चासाठी निधी पुरवते. १०० दिवसांवरील प्रती कुटुंब मजुरांच्या मजुरीच्या खर्चाचा आर्थिंक भार राज्य शासन उचलते. या अंतर्गत जिल्ह्यात विविध कामे सुरू आहेत. त्यावर काम करणाऱ्या मजुरांची हजेरी आता ऑनलाइन घेतली जात आहे.
याबाबत मनरेगाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. धनश्री लाभसेटवार म्हणाल्या, ‘मनरेगा अंतर्गत सार्वजिक आणि वैयक्तिक स्वरुपयाची २६२ प्रकारची कामे विविध विभागांमार्फत केली जात आहेत. मनरेगा विभागाकडून प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट दिले जाते. त्यानुसार मजुरांना त्यांच्या गावापासून पाच किलोमीटरच्या आत काम मिळते. मनरेगाच्या कामांमध्ये पारदर्शकता असून सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने केले जातात. सार्वजनिक कामांवर २० पेक्षा अधिक मजूर असल्यास त्यांची उपस्थिती मोबाईल उपयोजनद्वारे नोंदवली जात आहे.’
दरम्यान, मोबाइलद्वारे उपस्थिती नोंदविण्याचा हा पथदर्शी प्रकल्प असून त्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून एका गावाची निवड करण्यात आली आहे. हा प्रकल्प यशस्वी होत असून, येणाऱ्या काळात जिल्ह्यातील सर्व गावांत राबविण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

… म्हणून हजेरी ऑनलाइन घेण्याचा निर्णय
रोजगार हमी योजनेत बनावट देयके सादर करून मजुरांच्या नावाने केंद्राच्या निधीवर डल्ला मारण्याच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी आता नॅशनल मोबाइल मॉनिटरींग सॉफ्टवेअर (एनएमएमएस) हे उपयोजन विकसित करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर या प्रणालीची पूर्वचाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी ठरली. त्यामुळे या एनएमएमएस उपयोजनचा जिल्ह्यात अवलंब करण्यात येणार असून रोहयो अंतर्गत प्रत्येक मजुराला रोजगार, नियमित मानधन मिळणार असून त्यांची माहिती, कामाचे स्वरूप यांचे मूल्यांकन आणि पारदर्शकता हे सहज साध्य होणार आहे.

अशी होते ऑनलाइन हजेरीची नोंद

रोहयो अंतर्गत सुरु असणाऱ्या कामांच्या ठिकाणी २० किंवा त्यापेक्षा जास्त मजुरांची संख्या असेल, त्या ठिकाणी एनएमएमएस प्रणालीद्वारे मजुरांची उपस्थिती दर्शविण्यात येणार आहे. तत्पूर्वी मजुराने जॉबकार्डचा क्रमांक उपयोजनमध्ये संकलित करून त्याचे नाव, पत्ता, माहिती, कामाचे स्वरूप, कामाचे ठिकाण याची माहिती भरावी लागणार. त्यानंतर सकाळी ११ वाजता आणि दुपारी दोन ते पाच या वेळेत मजुराचे छायाचित्र आणि स्वाक्षरीसाठी देण्यात आलेला अंगठ्याचा ठसा एनएमएमएस या उपयोजनद्वारे घेतला जाणार आहे. काम करतानाचे छायाचित्र उपयोजनवर नसल्यास मजुरी मंजूर होणार नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attendance rohyo workers now online project successful pune district pune print news amy
First published on: 19-05-2022 at 20:53 IST