चित्रपट उत्सव, कार्यक्रमांचे आयोजन निकष निश्चितीनंतरच

पुणे : दसऱ्यानंतर नाटय़गृहे आणि चित्रपटगृहे सुरू करण्याची घोषणा झाली असली तरी त्याचे निकष अद्याप निश्चित नसल्याने याबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार आहे, याकडे सांस्कृतिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. निकष जाहीर होईपर्यंत ‘थांबा आणि वाट पाहा’, अशीच भूमिका सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांनी घेतली आहे.

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या उद्देशातून राज्यातील नाटय़गृहे आणि चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. टाळेबंदी आणि नंतरच्या टप्प्यात कडक निर्बंध शिथिल करताना गेल्या वर्षी रंगभूमी दिन म्हणजेच ५ नोव्हेंबरपासून ५० टक्के आसनक्षमतेमध्ये नाटय़गृहे आणि चित्रपटगृहे सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे १ मार्चपासून पुन्हा नाटय़गृहे आणि चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता आठ महिन्यांनंतर २२ ऑक्टोबरपासून राज्यातील नाटय़गृहे आणि चित्रपटगृहे सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, त्याचे निकष राज्य सरकारने अद्याप निश्चित केले नसल्याने सांस्कृतिक क्षेत्राचे लक्ष या निकषांकडेच लागले आहे.

नाटय़गृहे सुरू होत असली तरी निकष निश्चित होईपर्यंत थांबावे लागेल, असे ‘मनोरंजन’ संस्थेचे मोहन कुलकर्णी यांनी सांगितले. किती प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये नाटकांचे प्रयोग करायचे या मुद्दय़ाची उकल झालेली नाही. शहरातील नाटय़गृहातील दुपारी साडेबारा आणि सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या प्रयोगांना अडचण येईल, असे वाटत नाही. पण, रात्रीची संचारबंदी लागू असेल तर नाटय़गृहांमध्ये रात्री साडेनऊ वाजता होणाऱ्या प्रयोगांचे काय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वेळेची स्पष्टता झाल्यानंतर दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन शक्य होणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नाटय़गृहे आणि चित्रपटगृहे सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी पूर्वीप्रमाणेच ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती असेल का हे अद्याप सुस्पष्ट झालेले नाही. राज्य शासनाच्या आणि महापालिकेच्या निकषांनंतर कार्यक्रमांचे आयोजन करता येईल, असे ‘संवाद पुणे’ संस्थेचे सुनील महाजन यांनी सांगितले.

वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ऑनलाइनच

नाटय़गृहे सुरू होण्याचे निकष सुस्पष्ट झाल्यानंतरच आशय सांस्कृतिकतर्फे पु.ल. देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून नोव्हेंबरमध्ये ‘पुलोत्सवा’चे आयोजन करण्याचा मानस आहे. मात्र, पुलोत्सवाचे नियोजन करण्यासाठी कमी वेळ हाताशी आहे, असे आशय सांस्कृतिकचे सचिव वीरेंद्र चित्राव यांनी सांगितले. आशियाई चित्रपट महोत्सव प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये घ्यावा की ऑनलाइन याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ऑनलाइन करण्यात येणार असल्याचे चित्राव यांनी सांगितले.