पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने दुचाकी वाहनांच्या क्रमांकाची नवी मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील आकर्षक क्रमांक तीनपट शुल्क भरून चारचाकी वाहनांसाठी उपलब्ध होणार आहेत. हे क्रमांक हवे असणाऱ्यांना अर्ज सादर करण्याचे आवाहन ‘आरटीओ’ कडून करण्यात आले आहे.
वाहनांच्या क्रमांकाची नवी मालिका सुरू होत असल्याच्या दिवशी आरटीओ कार्यालयात एकाच वेळी मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत असते. त्यातून कार्यालयाच्या व्यवस्थेवर ताण येतो. या गोष्टी टाळण्यासाठी आकर्षक क्रमांकासाठी आगाऊ अर्ज मागविण्यात येत आहेत. तीनपट शुल्क भरून क्रमांक हवे असणाऱ्यांनी १२ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी अडीच या वेळेत अर्ज सादर करायचे आहेत. त्याचवेळी तीनपट रकमेचा डीडी जमा करावा लागणार आहे.
एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी १३ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांना क्रमांकासाठी करण्यात येणाऱ्या लिलावात सहभागी व्हायचे असल्यास त्या उमेदवारांनी त्याच दिवशी जादा रकमेचा डीडी बंद पाकिटातून कार्यालयात जमा करायचा आहे. लिलावात ज्या उमेदवाराने सर्वात जास्त रकमेचा डीडी दिला असेल, त्याला संबंधित नोंदणी क्रमांक दिला जाईल. नोंदणी क्रमांक राखून ठेवल्याच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही, तर राखीव नोंदणी क्रमांक आपोआपच रद्द होईल. त्याचप्रमाणे शुल्कही सरकारजमा होईल.