पुणे : ‘गांधींचा विचार सांगितला गेला नाही, अशी एकही जागतिक पर्यावरण परिषद झाली नाही. जगभरात गांधींचा विचार सांगितला जातो. प्रत्यक्षात मात्र गांधींच्या मार्गावर कोणीही चालत नाही,’ असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ-लेखक अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले. ‘आपली विचार करण्याची पद्धत अत्यंत जुनाट आहे. आर्थिक आणि आजूबाजूच्या परिस्थितीचे विचार वेगवेगळे करायला पाहिजे. हेच विचार महात्मा गांधींनीही सांगितले होते,’ असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित ‘महात्मा गांधी सप्ताहा’मध्ये ‘पोरेके पर्यावरण’ या विषयावर देऊळगावकर बोलत होते. महात्मा गांधींचे पणतू आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, विश्वस्त अन्वर राजन, लक्ष्मीकांत देशमुख, एम. एस. जाधव, रमेश आढाव यांच्यासह आप्पा अनारसे, तेजस भालेराव, सूरज कुलकर्णी, चंद्रकांत जाधव, रवींद्र धनक, प्रसाद गावडे, कमलाकर शेटे या वेळी उपस्थित होते.
देऊळगावकर म्हणाले,‘आता केवळ हवामान बदलत नाही. मूल्य व्यवस्था बदलली आहे. मानसिकतेत, सामाजिकतेत बदल झालेत. आदर्शवाद, विचारसरणीचा अंत झाला आहे. आपल्या विचार न करण्यामुळे जगाची मोठी हानी होत आहे. पृथ्वीची प्रकृती अत्यावस्थ आहे. प्रदूषणाची किंमत आपण थेट आपल्या आरोग्यातून चुकवत आहोत. पर्यावरणीय धोरणांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. युरोपातील काही देशांमध्ये कार्बन उत्सर्जनावर कर लावला जातो. आपल्या देशातही अशा प्रकारचा कर आणण्याची गरज आहे. विकासाची दिशा आणि जीवनशैलीही बदलायला हवी. महात्मा गांधींचे विचार जगण्यातील साधेपणा, गरजांपुरताच संसाधनांचा वापर आणि निसर्गाशी सुसंवाद ही तत्त्वे पर्यावरणीय संकटांवर उपाय ठरू शकतात. परस्परावलंबन आणि राष्ट्र या विचारांपलिकडे जात पर्यावरण प्रश्नांचा विचार केला पाहिजे. आताचे सगळे शास्त्रज्ञ, पर्यावरणतज्ज्ञ हेच संगतात. त्याच्या कित्येक दशकांपूर्वीच गांधींनी ‘जय जगत’चा नारा दिला. त्याही आधी भारतीय विचार परंपरेने विश्वबंधुत्वाचा नारा दिला आहे.’
‘शहरे मोटारकेंद्री नव्हे तर माणूसकेंद्री असली पाहिजेत. चित्रकला, वास्तुकला आदी कला-साहित्यांमध्ये पर्यावरणपूरक मूल्यांचा कलात्मक पद्धतींचा वापर करणे गरजेचे आहे. आपल्याकडे अनेक राजकीय नेते पर्यटनासाठी सिंगापूर, अॅम्सटरडॅमसारख्या ठिकाणी जातात. तेथून येताना मात्र पर्यावरणावरचा एकही चांगला प्रयोग, धडा इथे येऊन घेत नाहीत. आपल्याला उत्तम पर्यावरण, उत्तम राजकारण आणि उत्तम प्रशासन हवे असेल, तर ते मागावेच लागेल. मतदानावेळी लोक जे मागतात, तेच त्यांना मिळते. त्यामुळे आपण काय मागायचे, याचा विचार करायला हवा,’ असेही त्यांनी नमूद केले.
सूरज कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण सप्तर्षी यांनी आभार मानले.
‘मोहनदासकडून प्रेरणा घ्या’
‘पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी सरकार आणि उद्योग जबाबदार आहेत, असे आपण सहज म्हणतो. मात्र, आपल्या स्वतःच्या वर्तनाची जबाबदारीही आपण स्वीकारली पाहिजे. मनुष्यनिर्मित कचरा ही आजची प्रमुख समस्या आहे. प्रदूषण कमी करायचे असेल तर आपल्या सवयी बदलणे आवश्यक आहे. गांधींना महात्मा म्हणून जबाबदारी झटकली जाते. त्यापेक्षा मोहनदाससारखे जगा. त्यांच्याकडून प्रेरणा घ्या,’ असे मत तुषार गांधी यांनी व्यक्त केले. ‘एकदा मत दिल्यानंतर पाच वर्षांनंतरच आपली जबाबदारी, असा आपला समज आहे. त्यामुळे लोकशाहीत सत्तेत असलेले राजासारखे वागतात. प्रश्न पर्यावरणाचा असो की, राजकारण-प्रशासनाचा वेळोवेळी जबाबदारी निश्चित करणे गरजेचे असते,’ असेही त्यांनी नमूद केले.
