पिंपरी : ‘श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ही साधनेची, चिंतन आणि आध्यात्मिक भूमी आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी याच पवित्र भूमीमध्ये अखिल विश्वाच्या कल्याणासाठी भक्तीचा मार्ग दाखविणारी, पंचम वेद असणाऱ्या गाथेची निर्मिती केली. ही भूमी अतिशय समाधान व प्रसन्नता देणारी असून, येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकास आशीर्वाद देण्यासाठी तुकोबाराय आपल्या कार्याने, तत्परतेने उभे आहेत, असे आजही जाणवते. श्रीक्षेत्र भंडारा डोंगर वारकरी संप्रदायातील एक प्रेरणादायी शक्तिस्थळ म्हणून उदयास येईल,’ असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी व्यक्त केला.
लिमये यांनी श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला भेट देऊन तुकोबारायांच्या भव्य-दिव्य मंदिर निर्माण कार्याची पाहणी केली. श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांच्या हस्ते पगडी व वीणा प्रदान करून लिमये यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र धर्माचार्य संपर्कप्रमुख व श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाई देवस्थानाचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे, संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायक थोरात, पुणे विभागाचे सहकार्यवाह अविनाश भेगडे, पुणे विभाग प्रचारक मंगेश बडवे, पुणे जिल्हा कार्यवाह हेमंत दाभाडे, पिंपरी-चिंचवड जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, जिल्हा संपर्कप्रमुख सोमनाथ बोडके, देहू गट कार्यवाह सचिन ढोबळे या वेळी उपस्थित होते.
‘अयोध्यानगरीत साकारण्यात आलेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे शिल्पकारच तुकाराम महाराजांच्या मंदिर निर्माणाचे कार्य करीत आहेत. आजपर्यंत संतांनी, महापुरुषांनी केलेल्या साधनेला व पराक्रमाला प्रेरणा मानून समाजात अनेक दीपस्तंभ उभे राहिले आहेत. संत तुकाराम महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये पाचवा वेद निर्माण झाला आहे. देव, देश, धर्म व मानवतेच्या कल्याणासाठी साधुसंतांनी आपले जीवन व्यतीत केले आहे. साधुसंतांच्या याच विचारांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली शंभर वर्षे समाजाचे संघटन व राष्ट्राचे पुनरुत्थान व मानवतेचे कल्याण या भूमिकेतून अविरत कार्यरत असल्याचे लिमये यांनी सांगितले.
