पिंपरी : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) बडतर्फ प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर हिच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या तळवडेतील कंपनीचा दोन लाख ८७ हजारांचा थकीत मालमत्ता कर आणि एक लाख ७८ हजार रुपयांच्या पाणीपट्टीचा भरणा केला आहे. त्यामुळे कंपनीचा लिलाव टळला आहे. हेही वाचा >>> सुप्रिया सुळे यांचे समाजमाध्यमातील खाते हॅक प्रकरणी ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल पूजा खेडकर हिने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रहिवाशी पुरावा म्हणून तळवडेतील कंपनीचा पत्ता दिला होता. प्रमाणपत्रासाठी रेशन कार्ड ओळखपत्र म्हणून दिले होते. या रेशनकार्डवरही याच कंपनीचा पत्ता होता. तळवडे गावठाण, ज्योतिबानगर येथे असलेली थर्मोव्हेरिटा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पूजा हिची आई मनोरमा यांच्या नावावर आहे. कंपनीकडे सन २०२२ पासून दोन लाख ८७ हजारांचा मालमत्ता कर थकित होता. हेही वाचा >>> पुणे: जखमी तरूणाला उपचाराऐवजी खड्डयात गाडून पुरण्याचा प्रकार, सिंहगड रस्ता पोलिसांकडून दोघेजण ताब्यात नोटिशीनंतरही कर न भरल्याने १९ जुलै रोजी मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर कराचा भरणा करण्यास २१ दिवसांची मुदत होती. खेडकर कुटुंबीयांनी सहा ऑगस्ट रोजी दोन लाख ८७ हजार ५९१ रुपयांची मालमत्ताकराची थकबाकी भरली. त्याचबरोबर एक लाख ७८ हजार ६८० रुपयांची पाणीपट्टीही भरली आहे. त्यामुळे कंपनीवरील लिलावाची टांगती तलवार टळली आहे. तळवडेतील थर्मोव्हेरिटा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने थकीत कर भरला आहे. त्यामुळे लिलावाची कारवाई केली जाणार नाही, असे कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.