राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे आणि प्रवेश अर्ज निश्चित करणे यासाठी २७ ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे.

व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे आयटीआयची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा शासकीय आणि खासगी मिळून ९७५ आयटीआयमधील १ लाख ३५ हजार ७७३ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विविध व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया पाच फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे. मात्र मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी २७ ऑगस्टपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

विविध व्यवसायनिहाय प्रवेशासाठी उपलब्ध जागा; तसेच व्यवसाय अभ्यासक्रमाची माहिती आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती विभागाच्या http://www.dvet.admission.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. आयटीआयमधील सर्व व्यवसायांसाठी एकूण उपलब्ध जागांच्या ३० टक्के जागा महिला उमेदवारांकरिता राखीव असल्याचे डीव्हीईटीने स्पष्ट केले.