पिंपरी :  औंध जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वार्डचा (अतिदक्षता विभाग) दरवाजा बंद केल्याच्या रागातून एका रुग्णाने वृद्ध महिला रुग्णावर काचेने वार करून तिला जखमी केले. ही घटना सोमवारी (१३ एप्रिल) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास औंध जिल्हा रुग्णालय, पुणे येथे घडली.या प्रकरणात ६९ वर्षीय वृद्ध महिला रुग्णाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ४२ वर्षीय रुग्णाविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या औंध रुग्णालयातील आयसीयू वार्डमध्ये उपचार घेत होत्या. त्यांच्या बेडशेजारी आरोपी हा रुग्ण दाखल होता. त्याने फिर्यादीने दरवाजा बंद केल्याचा राग मनात धरला. आरोपी रुग्णाने रागाच्या भरात दरवाजाची काच फोडली आणि त्या तुटलेल्या काचेने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याजवळ मारून त्यांना जखमी केले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

जुना भांडणातून तरुणाचे अपहरण; टोळक्यावर गुन्हा दाखल

जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला जिवे मारण्याच्या उद्देशाने मोटारीतून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी (१२ एप्रिल) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वासुलीत घडली.

२६ वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आले होते. याबाबत १८ वर्षीय तरुणाने  उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सागर बाळू जावळे (३४, कुरकुंडी), नितीन संजय थिटे (२७, रेटवडी, खेड), सौरभ ऊर्फ सोन्या अनिल ढोरे (२८, वरची भांबरवाडी, खेड), अजय भरत गोपाळे (२३, अहिल्यादेवी चौक, खेड), कुणाल प्रशांत चव्हाण (२३, अहिल्यादेवी चौक, खेड), ओमकार दशरथ कोरडे (२४, सांडभोरवाडी, खेड) यांना अटक केली असून एका विधीसंघर्षित बालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मोटारीमधून एकत्र येत तरुणाला गाठले. जुन्या भांडणाच्या रागातून त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने मोटारीत घालून त्याचे अपहरण केले. अपहरण केलेला तरुण मिळून आला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. उत्तर महाळुंगे पोलीस तपास करत आहेत.

डिझेल भरण्याच्या वादातून पेट्रोल पंपावर राडा; रॉडने मारहाण

पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले असून आरोपींनी चालकाला लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (१२ एप्रिल) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास निघोजेत घडली.

या प्रकरणात भरत तुकाराम पालवे (४३, डोंगरवस्ती, निघोजे, मूळ रा. बीड) यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैद्यनाथ संतोष यादव (३३), लवकुश शिवगणेश यादव (२२) या दोघांना अटक केली असून त्यांच्या दोन साथीदारांविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ट्रेलरमध्ये डिझेल भरण्यासाठी गेले असता पेमेंट केल्याचा मेसेज न आल्याच्या कारणावरून त्यांचा पंपावरील कर्मचाऱ्यांशी वाद झाला. हा वाद मिटल्यानंतर फिर्यादी आपल्या मित्रांसह हॉटेलमध्ये जेवण करत असताना आरोपींनी तिथे येऊन शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी जाब विचारण्यासाठी पेट्रोल पंपावर गेले असता आरोपींनी लोखंडी रॉड आणि काठीने केलेल्या मारहाणीत फिर्यादी आणि त्यांचे मित्र गंभीर जखमी झाले. वैद्यनाथ आणि लवकुश यादव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दक्षिण महाळुंगे पोलीस तपास करत आहेत.

रॉन्ग साईडने आल्याचा जाब विचारल्याने रिक्षा चालकाकडून एकावर हल्ला

रस्त्याच्या विरुद्ध दिशेने रिक्षा घेऊन आल्याबाबत विचारणा केल्यामुळे चिडलेल्या रिक्षा चालकाने एका व्यक्तीला लोखंडी टामीने मारून जखमी केले. ही घटना रविवारी (१२ एप्रिल) रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास पुनावळेत घडली.

याबाबत प्रवीण प्रकाश कुंभार (३४, पुनावळे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी संतोष अशोक भोसले (२७, जांभे, मुळशी) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या मोटारीमधून जात असताना आरोपी रिक्षा चालक विरुद्ध दिशेने रिक्षा घेऊन आला. फिर्यादीने त्याला ‘रॉन्ग साईड’ने का आला असे विचारले असता त्याने फिर्यादीला मोटारीमधून खाली उतरवून शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर रिक्षातील लोखंडी टामीने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या तळहातावर जोरात मारले. यात त्यांना गंभीर जखम होऊन सात टाके पडले आहेत. रावेत पोलीस तपास करत आहेत.