लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : ‘औरंगजेब आणि बॅरिस्टर महंमद अली जिना हेच भारतातल्या मुस्लिमांचे खरे शत्रू होते. औरंगजेबाच्या हट्टाने समृद्ध असलेले मुघल साम्राज्य लयाला गेले आणि बॅरिस्टर जिनांच्या हट्टामुळे मुसलमानांना भारतासारख्या समृद्ध प्रांतापासून वेगळे व्हावे लागले. हिंदुत्वापेक्षाही मुस्लिम धर्मियांचे हेच मोठे शत्रू होते,’ असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी शनिवारी व्यक्त केले.
भांडारकर प्राच्यविद्या मंदिराच्या नवलमल फिरोदिया सभागृहात आयोजित कार्यक्रमात इतिहास अभ्यासक रोहित पवार यांनी अनुवादित केलेल्या सुरेंद्रनाथ सेन लिखित ‘फॉरेन बायोग्राफीज् ऑफ राजा शिवछत्रपती’ या पुस्तकाचे प्रकाशन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. गणेश राऊत, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे विश्वस्त राजेश पांडे, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार, प्रकाशक चेतन कोळी आदी या वेळी उपस्थित होते.
मोरे म्हणाले,‘छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या युगाचे युगांतक आणि नवीन युगाचे प्रवर्तक होते. त्यांनी चारशे पाचशे वर्षांची जुलमी राजवट संपवली. एका युगाचा अंत करून नव्या युगाची सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज हे काळाच्या मध्यावर उभे होते. नव्या युगाची सुरुवात करणारे युगप्रवर्तक म्हणून शिवचरित्राचा अभ्यास आणि वारंवार उजळणी होणे गरजेचे आहे. प्रजेला आणि राज्याला प्रेम देणारे शिवाजी महाराज जागतिक कीर्तीचे होते.’
‘औरंगजेब क्रूरकर्मा होता. त्यात वाद नाही. एवढ्या मोठ्या साम्राज्याचा राजा असूनही औरंगजेबाचे चरित्र लिहावे असे कुणाही समकालीन प्रवाशाला वाटलं नाही. मात्र, शिवाजी महाराज हे चरित्राचा विषय असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या सत्तेला आव्हान दिले, ती मोगलांची सत्ता फार मोठे साम्राज्य होते. युरोपातही त्या वेळी साम्राज्ये अस्तित्वात नव्हती. केवळ छोटी राष्ट्र होती. परदेशी प्रवाशांची प्रवासवर्णने हे इतिहास अभ्यासात महत्त्वाचे साधन आहे. त्यांचा अभ्यास करायला हवा. त्यावरून जगाला आपल्या राजाची किर्ती सांगणे सोपे होईल,’ असेही मोरे यांनी सांगितले.
जाती जातीतील भांडणामुळे महाराष्ट्र गेल्या शंभर वर्षांत प्रगती करू शकला नाही. महाराष्ट्राची पिछेहाट झाली, अशी खंत ही मोरे यांनी या वेळी व्यक्त केली. इतिहासाचे प्राध्यापक गणेश राऊत, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी मनोगते व्यक्त केली. कोळी यांनी प्रास्ताविक केले.