मराठी माणूस उद्योग विश्वात मोठा झाला आहे. परंतु स्वत:चा ब्रँड निर्माण करू न शकल्याने आपला प्रभाव पाडू शकलेला नाही. उद्योग, व्यवसाय कोणीही निर्माण करू शकतो, मात्र ब्रँड निर्माण करण्यासाठी जिद्द, चिकाटी याबरोबरच हुशारी आवश्यक असते, अशी भावना व्यक्त करत, व्यवसायात स्वत:चा ब्रँड निर्माण केलेल्या उद्योजकांनी त्यांच्या ‘ब्रँडनामा’चा प्रवास उलगडला.
रसिक आंतरभारती आणि प्रतिसाद कम्युनिकेशन्सतर्फे अभिजित जोग यांच्या ‘ब्रँडनामा’ या पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, परांजपे स्कीम्सचे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे, चितळे बंधूचे श्रीकृष्ण चितळे आणि पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ या चार ब्रँड निर्माण केलेल्या उद्योजकांशी संवाद साधण्यात आला. या उद्योजकांच्या यशाचे गमक चित्रपट लेखक क्षितिज पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीतून उलगडले.
ठाकूर म्हणाले,‘ फक्त उत्पादनालाच ब्रँड, जाहिरात करण्याची आवश्यकता असते. परंतु हीच बाब सेवा क्षेत्रालाही लागू पडते. जनतेसमोर आपले अस्तित्व सतत दिसले पाहिजे, तरच लोक आपल्याकडे येतात. त्यामुळे ब्रँडमध्ये गुंतवणूक आवश्यक ठरते.’
चितळे म्हणाले,‘ मला एमबीए करायचे होते, मात्र त्याकाळी नोकरी करायची असेल तर त्याला महत्त्व होते. स्वत:च्याच व्यवसायात जायचे तर त्याची काय गरज असे अनेकांनी म्हटल्यामुळे मी थेट व्यवसायात आलो. व्यवसाय वृद्धीसाठी ब्रँड आणि ट्रेडमार्क आवश्यक ठरतो.’
गाडगीळ म्हणाले,‘ लहानपणापासून दुकानात जायचो. त्याच व्यवसायात जायचे हे ठरविले नव्हते. पण मी एमबीएचे शिक्षण घेत असताना, आमच्या व्यवसायात दक्षिण आशिया आणि सिंगापूरमध्ये काही प्रश्न निर्माण झाला आणि तो सोडवायला जाऊ का? असे मी दाजीकाकांना विचारले आणि तेथून व्यवसायात माझे पदार्पण झाले. ब्रँडचे म्हणाल तर ब्रँडला कोणत्याही मर्यादा नसतात. तसेच ते व्यक्तीपासून वेगळे करता येत नाही आणि ब्रँिडगमध्ये चांगले किंवा वाईट असे काही नसते.’
परांजपे म्हणाले,‘ सचोटी आणि गुणवत्ता हा आमचा वारसा होता. पण नव्या पिढीला आपलेसे करण्यासाठी आम्ही काही दशकांपूर्वी ‘प्रेरणा नव्या भारताची’ ही संकल्पना रुजवली. आपली संस्कृती जपतानाच जगभरातील चांगल्या गोष्टी शिकायला हव्यात.’
खेडेकर म्हणाले,‘ जाहिरातबाजीला महत्त्व न दिल्याने आपण मागे पडलो असे झाले नाही. मात्र प्रभाव पाडण्यात कमी पडलो असे म्हणण्यास नक्कीच वाव आहे.’ जोग यांनी ‘ब्रँडनामा’ या पुस्तक लेखनामागची भूमिका व्यक्त केली. अनिश जोग आणि योगेश नांदुरकर यांनी प्रास्ताविक केले. शैलेश नांदुरकर यांनी आभार मानले.