पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर बोरीभडक भागात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला मालवाहू जीपने धडक दिल्याने रिक्षाचालकासह ११ विद्यार्थी जखमी झाले. यात सहा विद्यार्थिनींचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडून देण्यात आले.


अपघातात रिक्षाचालक संदीप पोपट कोळपे (रा. बोरीभडक, ता. दौंड, जि. पुणे ) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात श्रद्धा नवनाथ गव्हाणे (वय १३), हर्षद निलेश वाघमारे (वय १६), वैष्णवी अप्पासाहेब गव्हाणे (वय १२) मोहन कोळपे (वय १०), तनुजा मोहन कोळपे (वय १०), करण विठ्ठल गोसावी (वय १३), आरती विठ्ठल गोसावी (वय १४), सानिया अंकुश येळकर (वय १३), भक्ती बाबुराव शिंदे (वय १५), अमर बाबुराव शिंदे (वय १५), मयुरी अशोक शिंदे (वय ११, सर्व रा. बोरीभडक, ता. दौंड, जि. पुणे) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उरळी कांचनधील खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले, अशी माहिती यवत पोलिसांनी दिली.


जखमी विद्यार्थी उरळी कांचनमधील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना घेऊन रिक्षाचालक संदीप कोळपे सकाळी साडेसातच्या सुमारास बोरीभडकहून उरळी कांचनकडे जात होता. रिक्षात अकरा विद्यार्थी होते. बोरीभडक गावापासून काही अंतरावर भरधाव मालवाहू जीपने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक दिल्याने रिक्षा उलटली. अपघातानंतर जीपचालक पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी विद्यार्थ्यांसह रिक्षाचालकाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातात रिक्षाचालक कोळपेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.