पुणे : ‘आधुनिक वैद्यकशास्त्रात आजार बरे करण्याचे उपचार असले तरी, आजारच होऊ नये आणि निरोगी कसे राहावे, हे आयुर्वेदाने सांगितले आहे. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी आयुर्वेद दिशादर्शक आहे,’ असे मत चाणक्य मंडलचे संस्थापक आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी रविवारी व्यक्त केले.

नावीन्य प्रकाशनाच्या वतीने वैद्य परीक्षित शेवडे आणि वैद्य स्वराली शेंड्येलिखित ‘स्त्रियांचे आरोग्य आणि आयुर्वेद’, ‘निरोगी रहा’ व ‘बालकांचे आरोग्य आणि आयुर्वेद’ या पुस्तकांचे प्रकाशन धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. प्रकाशक नितीन खैरे या वेळी उपस्थित होते.

ढासळत जाणारी कुटुंबव्यवस्था, विवाहसंस्था, बदलती जीवनशैली यावर भाष्य करून धर्माधिकारी म्हणाले, ‘एकविसाव्या शतकातील माणसाच्या अनैसर्गिक आणि मुदतपूर्व मृत्यूला केवळ ताण हीच एक बाब ठरू शकते, असे भाकीत आपल्या पूर्वजांनी केले होते. हे आता खरे ठरत असेल, तर त्याच्या मुळाशी भोगवादी संस्कृती आहे. ती बळावत असून, त्यातून ताण निर्माण होत आहेत.

प्राचीन शास्त्रात मन हे सहावे इंद्रिय असल्याचे सांगितले. हे आता विज्ञानानेही मान्य केले आहे.’ या तिन्ही पुस्तकांतून आपल्याला प्रत्यक्षात काय करता येऊ शकते आणि आयुर्वेदातील ज्ञान आपल्याला आचरणात कसे आणता येऊ शकते, या विषयी शेवडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. दिनचर्या आणि ऋतूचर्येविषयी मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे शेंड्ये यांनी सांगितले.