पुणे : ‘आशाताई. मानवाच्या इतिहासातील महान कलाकार. ॲब्सोल्युटली ऑल टाइम ग्रेट. सनदी अधिकारी होण्यापूर्वी ज्ञानप्रबोधनीचा पूर्णवेळचा कार्यकर्ता होतो. ज्ञानप्रबोधनीला आर्थिक मदत मिळावी म्हणून आम्ही कार्यकर्त्यांनी १९८२ मध्ये सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर आशाताईंची मैफल भरवली. ‘आशा इज होप,’ असे त्या कार्यक्रमाचे नाव होते. मैदान गर्दीने भरलेले. अशा वातावरणात आशाताईंच्या खळखळत्या आवाजाने मैफलीला रंगत आणली. कार्यक्रम गाजला. आशाताईंचा आवाज शाश्वत आहे,’ अशा शब्दांत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी आशा भोसले यांच्या आठवणींना उजाळा दिला.
ते म्हणाले, ‘आशाताईंना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याची बातमी वाचली आणि काळजाचा ठोका चुकला. आज (१२ एप्रिल) त्यांनी देह ठेवला. पण, आशाताई अमर आहेत. त्यांचा आवाज शाश्वत आहे. ‘उषःकाल होता होता काळरात्र झाली,’ हे सुरेश भटांचे शब्द आपल्या विजेसारख्या आवाजाने अजरामर करणाऱ्या आशाताईंचे जाणे आपल्याकरता काळरात्रच आहे. सुरेश भटांनी या गाण्यात ‘अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !’ अशी सादही घातली आहे. विझलेल्या मनाच्या मशालीसुद्धा पुन्हा पेटतील, असा आवाज आशाताईंना लाभला.
संगीताचा-गायनाचा असा एकही प्रकार नाही की, जो त्यांनी गायला नाही. संगीताची साधना हीच तुमची देशभक्ती आहे, हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेला संदेश आशाताईंसह मंगेशकर कुटुंबियांनीही अखेरपर्यंत जपला. संगीतासह जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये न थकता, न थांबता सतत प्रतिभेची साधना करत राहणे, हीच आशाताईंना खरी श्रद्धांजली ठरेल.’
चाणक्य मंडल परिवाराची तीन दशकांची वाटचाल आणि चाणक्य मंडळ विद्यापीठाच्या स्थापनेनिमित्त विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या वतीने चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक-संचालक अविनाश धर्माधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते धर्माधिकारी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना धर्माधिकारी बोलत होते. महापौर मंजुषा नागपुरे, अविनाश धर्माधिकारी यांच्या पत्नी पूर्णा धर्माधिकारी, कोहिनूर समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, विदिशा विचार मंचाच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी आदी उपस्थित होते.
चाणक्य मंडल विद्यापीठाची घोषणा
‘जगातील सर्वोत्तम अशा भारतीय ज्ञान परंपरेचे केवळ गोडवे गाणे पुरेसे ठरणार नसून जबाबदार भारतीय नागरिकाच्या नात्याने या ज्ञान परंपरेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी चाणक्य मंडल विद्यापीठाची स्थापन करण्यात येणार आहे,’ अशी घोषणा चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक-संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी केली.
अविनाश धर्माधिकारी म्हणाले, ‘कृत्रिम बुद्धीमत्ता हे केवळ आव्हान नसून त्यामध्ये अनेक संधी दडल्या आहेत. संस्कृत भाषा ही कुत्रिम बुद्धीमत्तेच्या अल्गोरिदमासाठी अत्यंत उपयुक्त भाषा आहे. त्यावर परदेशात अभ्यास सुरू आहेत. मात्र, आपल्याला त्याचा थांगपत्ताही नाही. नालंदा आणि तक्षशीला विद्यापीठांचा वारसा आपल्या देशाला लाभला आहे. हाच वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी पाश्चात्यांच्या शिक्षण प्रणालीचे अनुकरण न करता जागतिक पातळीवर सिध्द होईल, असे विद्यापीठ येत्या काळात उभारण्यात येणार आहे.’
तन्वी मेहेंदळे यांनी पसायदान सादर केले. क्षेमकल्याणी यांनी सूत्रसंचालन केले. मंचाचे समन्वयक नितीन जळूकर यांनी आभार मानले.
