पुणे : ‘संस्कृती टिकवण्यासाठी वारकरी आणि प्रसंगी तलवार उचलणारा धारकरी दोन्हीही गरजेचे आहे,’ अशा शब्दांत अविनाश धर्माधिकारी यांनी वारकरी-धारकारी वादावर भाष्य केले.लोणावळ्यातील मन:शक्ती प्रयोग केंद्राच्या वतीने आयोजित मन:शक्ती सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात अविनाश धर्माधिकारी बोलत होते.
महापौर मंजूषा नागपुरे, मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, चाणक्य मंडल परिवारचे संचालक अविनाश धर्माधिकारी, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, संस्थेचे विश्वस्त प्रमोद शिंदे, गजानन केळकर आणि नितीन राजणेकर उपस्थित होते. याच कार्यक्रमात सन्मान सत्कृत्याचा उपक्रमांतर्गत दुवा केंद्र फाउंडेशन आणि सोलापूर येथील भैरवनाथ प्रशाला या संस्थांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अनिरूद्ध दडके यांनी सूत्रसंचालन केले. केळकर यांनी आभार मानले.
‘वारकरी संप्रदायात भक्तीभाव मुख्य’
‘वारकरी संप्रदायात अतिशय साध्या अटी, साधे नियम आहेत. अभद्र वर्तन करायचे नाही. तुळशीची माळ गळ्यात ठेवायची, एकादशीचे व्रत करायचे, नित्य हरिपाठ वाचायचा, इतके सोपे नियम आहेत. कुलदैवत, कुलदेवता कोणीही असली तरीही, वारकरी म्हणून देव एकच. तो म्हणजे विठ्ठल. वारकरी संप्रदायात भक्तीचा भाव मुख्य आहे,’ असे मत मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले.
देगलूरकर म्हणाले, ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या काळापासून वारकरी संप्रदायाने समाज प्रबोधनाचे काम केले. हा परकीय आक्रमणांचा काळ होता. अल्लाउद्दीन खिलजी, महंमद तुघलक असे अनेकजण या भूमीवर एकापाठोपाठ हल्ला करत होते. अशा प्रसंगात समाजाला एक ठेवण्यासाठी संतांनी एकत्र आले पाहिजे, एकत्र चालले पाहिजे, एकत्रच भोजन केले पाहिजे, अशी शिकवण दिली. त्यातूनच एकच देव आणि तो म्हणजे विठ्ठल, अशी धारणाही निर्माण झाली.’
‘आपल्या देशाची ज्ञानपरंपरा समृद्ध आहे. त्यात योग आणि विज्ञानाधिष्ठित अध्यात्म, ही भारताची बलस्थाने आहेत. या मार्गाने पुढे जात शांत-स्थिर आणि एकाग्र चित्ताने राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्येकानेच प्रयत्न केले पाहिजेत,’ असेही त्यांनी नमूद केले.‘विज्ञान आणि अध्यात्म हे दोन्ही वेगवेगळे घटक नाहीत. या दोन्हींचा संगम आपल्या भारतीय परंपरेत झालेला दिसतो.
संत साहित्यातही या परंपरेचा वेध घेता येतो. भगवद्गीता, रामायण, महाभारत यामध्ये वैज्ञानिक सूत्र आढळून येतात. हे विज्ञानाधिष्ठित संस्कार आणि राष्ट्रविचार हा भारताचा पाया आहे. मात्र, आता कुठे देशाचे पंतप्रधान इतर राष्ट्रांच्या प्रमुखांशी भेटताना त्यांना आपल्या परंपरेचे प्रतीक म्हणून भगवद्गीता देतात. नव्या शिक्षण धोरणात या विचारांचा समावेश करणे गरजेचे आहे,’ असे अविनाश धर्माधिकारी यांनी नमूद केले.
‘वारकरी-धारकरी दोन्हीही आवश्यक’
‘विश्वशांतीचा संदेशही देणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी जो जे वांछिल, तो ते लाहो, अशी प्रार्थना सांगितली. एकच धर्म, एकच देव श्रेष्ठ आहे. म्हणून होणाऱ्या आक्रमणांच्या काळातही छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून हे पसायदान आपल्यापर्यंत पोहोचले. आपली संस्कृती टिकवायची असेल, तर वारकरी आणि धारकरी हे दोन्ही प्रवाह तितकेच आवश्यक आहेत,’ असे अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.
