scorecardresearch

पुणे : वकील महिलेची विनयभंग, खंडणी, बदनामीची तक्रार घेण्यास टाळाटाळ

कोंढवा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : वकील महिलेची विनयभंग, खंडणी, बदनामीची तक्रार घेण्यास टाळाटाळ
(संग्रहीत छायाचित्र)

वकीलपत्र सोडण्यासाठी दबाव टाकून विनयभंग करून खंडणीची मागणी केल्याची तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्यानंतर न्यायालयात धाव घेतलेल्या वकील महिलेच्या खासगी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोंढवा पोलिसांना देण्यात आले.  कॅन्टोन्मेंट न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एन ओंडारे यांनी हे आदेश दिले आहेत.

वसीम इकबाल खान, नदीम सय्यद, भरत जाधव आणि अतीका नदीम सय्यद ( सर्व रा. सनशाईन हिल्स, पिसोळी गाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. याबाबत एका तक्रारदार वकील महिलेनी न्यायालयात अ‍ॅड. साजिद शाह, अ‍ॅड. अमित मोरे खासगी तक्रार दाखल केली होती.

महिलेकडे धमक्या दिलेल्याचे रेकॉर्डिंग –

अ‍ॅड. शाह यांनी सांगितले, तक्रारदार महिला ही वकील असून सोसायटीमधील गैरव्यवहारात सहभागी असलेल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी सोसायटीतील नागरिकांनी तक्रारदार महिलेची कायदेशीर सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. याबाबत संशयित आरोपींना समजल्यानंतर त्यांनी तक्रारदारावर व त्यांच्या परिवाराला मानसिक, शारीरिक त्रास देत कायदेशीर मदत न करण्याची धमकी त्यांना दिली. परंतु त्यांनी आरोपींच्या कोणत्याही दबावाला त्या बळी पडल्या नाहीत. त्यांच्यावर पाळतही ठेवली जात असल्याने त्यांनी याबाबत संशयितांना विचारणा केली. त्यावेळी यातील एकाने मी एका गँगचा सदस्य असल्याचे सांगत ही केस सोडण्याची व तिचे अपहरण करण्यची धमकी दिली. तक्रारदार महिलेकडे धमक्या दिलेल्याचे रेकॉर्डिंग होते. ते त्यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात दाखवूनही त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही. वरिष्ठांनी देखील त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यानंतर १६ जानेवारी रोजी आरोपींपैकी एकाने अपमानजनक व अश्लील शब्द वापरून फिर्यादीचा विनयभंग केला. तसेच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचेही न्यायालयीन तक्रारीत म्हटले होते.

फेसबुक व यु ट्युब चॅनलच्या माध्यमातूनही बदनामी –

यासंबधी व्हिडीओ रेकॉर्डिगही त्यांनी पोलिसांकडे सादर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना कोणतीही दाद न मिळाली नाही. ९ फेब्रुवारीला त्यांच्या पतीलाही मारहाण करण्यात आली. फेसबुक व यु ट्युब चॅनलच्या माध्यमातूनही बदनामी केली. तसेच त्यांच्या घराबाहेरी सिसीटीव्हीही तोडून टाकले, दरवाजा तोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या घराच्या भिंतीवर पत्र चिकटवून ३० हजारांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करताना पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतल्याचे म्हटले. त्यावर न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश कोंढवा पोलिसांना दिले आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Avoid taking complaint of molestation extortion defamation of female lawyer pune print news msr

ताज्या बातम्या