सध्या देशभरात अनेक ठिकाणी ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ला विरोध होताना दिसत आहे. तर दुसरीकडे केंद्रातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाकडून याबाबत सर्वस्तरावर जनजागृती केली जात आहे. यासाठी भाजपाचे कार्यकर्ते या कायद्याचा प्रचार आणि प्रसार करता दिसत आहेत. अशाचप्रकारे पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात नागरिकत्व कायद्या बद्दलची माहिती पुस्तिका वाण म्हणून महिलांना देत याबाबत जनजागृती केली.

भाजपा कार्यकर्त्यांकडून राष्ट्रीय पातळीपासून ते थेट शहर व गाव पातळीपर्यंत सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ जोरादार प्रचार आणि प्रसार सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहरात संक्रांतीनिमित्त भाजपाच्या कार्यकर्त्या विणा सोनवळकर यांनी घरगुती हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात वाण द्यायची पद्धत असते, म्हणून त्यांनी महिलांना सीएए व एनआरसीबाबतची माहिती पुस्तिका वाटप केली.

वीणा सोनवळकर म्हणाल्या, मकर संक्रांतीच्या निमित्त हळदी-कुंकवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मैत्रिणी, महिलांना बोलावले होते. दरवर्षी मकरसंक्रांतीला हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात काही तरी वस्तू वाण म्हणून लुटली जाते. यावेळेस काहीतरी वेगळे म्हणून थोडा विचार केला आणि नागरिकत्व सुधारणा कायद्या बाबतची जनजागृती करण्याचे ठरवले. आज समाजात यासंदर्भात अनेक समज-गैरसमज निर्माण झालेले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी निदर्शने देखील केली जात आहेत, विरोध केला जात आहे. हे पाहता नागरिकांना याबाबत योग्य माहिती मिळावी आणि नागरिकांपर्यंत हा खरा कायदा पोहचावा या उद्देशाने मी माहिती पुस्तिका वाटपाचा उपक्रम राबला.