पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींनी स्फोटकांचा वापर करून अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी तब्बल १६ लाख घेऊन पोबारा केला. एटीएम फोडल्याची घटना पहाटेच्या वेळी घडली. अज्ञात आरोपींनी एटीएम परिसरातील घरांच्या बाहेरून कड्या लावल्या होत्या, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “पिंपरी-चिंचवड शहराजवळ असलेल्या चिंबळी गावात अज्ञात ३ ते ४ व्यक्तींनी एटीएम फोडले आहे. एटीएम फोडण्यासाठी आरोपींनी स्फोटकांचा वापर केला. स्फोट झाल्यानंतर एटीएम मशीन फुटून चक्काचूर झाले. मात्र, मशीनमधील नोटा जळल्या नसून यातील १६ लाख रक्कम आरोपींनी पळवली आहे. घटनेनंतर बॉम्ब शोधक नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

हेही वाचा : चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारीच निघाली दुचाकी चोर, टोळी गजाआड, ११ वाहनं जप्त, नेमकं काय घडलं?

आरोपींनी चोरी करताना अॅक्सिस बँकेच्या एटीएम परिसरातील सर्व घरांच्या बाहेरून कडी कोयंडा लावला होता. यावरून हा पूर्वनियोजित कट असल्याचं निदर्शनास येत आहे. दरम्यान, तेथील एका व्यक्तीने आरोपींना पाहिलं असून तो आरोपींना घाबरून घरात लपला. अज्ञात ३-४ व्यक्ती असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.