कंत्राटी कामगार आणि त्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार हा सामाजिक विषमतेचे पोषण करतो. भ्रष्टाचाराविरुद्ध पोटतिडकीने आंदोलन करणारे अण्णा सामाजिक विषमतेविरोधात बोलत नाहीत, या वास्तवावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी शुक्रवारी बोट ठेवले. विषमता पोसणाऱ्या तत्त्वज्ञानाचे करायचे काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे डॉ. आढाव यांच्या हस्ते गोविंद पानसरे यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानव कांबळे यांना एस. एम. जोशी कार्यकर्ता पुरस्कार आणि नागपूर येथील रुबीना पटेल यांना डॉ. राम आपटे प्रबोधन पुरस्काराने गौरविण्यात आले. निधीच्या अध्यक्षा प्रा. पुष्पा भावे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
सध्या स्वयंसेवी संस्थांचा सुळसुळाट झाला आहे. पण, सन्मानाने, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने झगडणाऱ्यांसाठी निधी ही संस्था आहे. समाजामध्ये राज्यकर्त्यांविरोधात उद्रेक आहे. त्यातून अनेक केजरीवाल निर्माणही होतील. पण, काम करणे जमले नाही तर ते निराशेच्या गर्तेत जातील. असे केजरीवाल निराशेच्या गर्तेत गेले तर त्यांच्यामागे जाणारी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांची फळी निराश होईल याकडे डॉ. आढाव यांनी लक्ष वेधले. सावित्रीच्या लेकी म्हणवून घेत जीवनाच्या सर्व क्षेत्रांत पुढे जात असलेल्या स्त्रियांचे कौतुक आपण परिवर्तनवादी करीत नाही, असेही ते म्हणाले.
परिवर्तनवादी हा शब्द आपण स्वस्त केला आहे, असे सांगून पुष्पा भावे म्हणाल्या, सत्तेमध्ये बदल झाला म्हणजे परिवर्तन नव्हे. तर, विचारांच्या मूळ गाभ्यामध्ये झालेला बदल म्हणजे परिवर्तन हे ध्यानात घेतले पाहिजे. भाषेचे खेळ करून लोकांना फसविणाऱ्या डोंबाऱ्यांना थोपविले पाहिजे.
पानसरे म्हणाले, चळवळी मंदावल्या आहेत असा अपप्रचार केला जात आहे. अन्याय, अत्याचार सुरू असलेल्या देशातील चळवळी मंदावतीलच कशा. अर्थात ज्या रितीने, गतीने, विचारांच्या आधारे चळवळी सुरू आहेत त्याविषयी मतभेद असू शकतील. प्रत्येक चळवळीची अभिव्यक्ती ही उद्रेकातूनच होते. पण, तिला वळण देण्याचे कामही जनतेलाच करावे लागेल. अण्णा हजारे आणि अरिवद केजरीवाल यांच्या व्यवहारांशी आणि विचारांशी मी सहमत नाही. पण, त्यांच्यामागे लोक उभे राहिले ही सकारात्मक बाब आहे. ‘भांडवलशाही मुर्दाबाद’ असे म्हणायला आता कम्युनिस्टही बिचकतात. मी दहा लढाया हरलो असेन. पण, युद्ध बंद केलेले नाही. प्रत्येक लढाईतून नव्या लढाईचे बळ मिळते. जिद्द असलेले नवे कार्यकर्ते घडविण्यात आम्ही कमी पडलो.
या वेळी मानव कांबळे आणि रुबीना पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. सुभाष वारे यांनी सूत्रसंचालन केले. काका पायगुडे यांनी आभार मानले.