पुणे : ‘कुराणावर भाष्य करण्याचा अधिकार मिळवलेले, देश स्वतंत्र करण्यासाठी धर्मविचाराशी सांगड घालणारे, स्वातंत्र्यलढ्यात सर्वोच्च नेत्यांमध्ये स्थान असलेले मौलाना अबुल कलाम आझाद यांची येथील बहुसंख्याकांनी आणि ज्या समाजात जन्म घेतला, त्या अल्पसंख्याक समाजानेही उपेक्षाच केली’, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी मंगळवारी व्यक्त केली.

राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने मौलाना आझाद जयंती आणि शिक्षण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. त्या वेळी डाॅ. आढाव बोलत होते. नॅशनल मुस्लिम फ्रंटचे संस्थापक हाजी नदाफ यांच्या हस्ते मौलाना आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. समितीचे निमंत्रक नितीन पवार, बांधकाम मजदूर सभेचे अध्यक्ष ॲड. मोहन वाडेकर, रिक्षा पंचायतीचे खजिनदार प्रकाश वाघमारे, रिक्षा पंचायत पतसंस्थेचे संचालक सोपान घोगरे, विजय जगताप, अर्जुन लोखंडे, मोहम्मद अतीक शेख, रियाझ शेख, मिलिंद गायकवाड या वेळी उपस्थित होते.

डॉ आढाव म्हणाले, ‘मौलाना आझाद यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. नगरच्या तुरुंगात असताना पत्नीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी ब्रिटिश सरकारच्या अटी त्यांनी मान्य केल्या नाहीत आणि तुरुंगातच राहणे पसंत केले. मुस्लिमांनी पाकिस्तानात जाण्यासाठी आपली ही मातृभूमी सोडू नये, याकरिता ते दिल्लीच्या जामा मशिदीसमोर उभे राहून आवाहन करत होते. मुस्लिम समुदायाला स्वातंत्र्यलढ्याच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी इस्लाममध्ये मांडलेल्या विचारांचा हवाला दिला होता.’

पवार म्हणाले, ‘जागतिक गुणवत्ताधारक शिक्षण संस्थांमध्ये (क्यू एस रँकिंग )भारतीय तंत्रज्ञान संस्थांनी (आयआयटी) आघाडी घेतली. मौलाना आझाद भारताचे पहिले शिक्षणमंत्री असताना त्यांच्या काळात या संस्था स्थापन झाल्या आहेत. भारतात आज शिक्षणाचा जो प्रसार झाला. त्यात मौलाना आझाद यांचे योगदान मोठे आहे. स्वातंत्र्य लढ्याचा मुख्य प्रवाह असणाऱ्या राष्ट्रीय सभेचे ते तब्बल तीन वेळा अध्यक्ष होते. एवढी ज्येष्ठता त्यांनी आपल्या ज्ञान आणि कर्तृत्वाने मिळवली होती.’