पुणे : ढगांचा रंग काळाच का असतो? पृथ्वी गोलच का आहे? ती साडेतेवीस अंशांनी झुकलेली का आहे? कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर कसा आणि कधी करावा ? या अन अशा अनेक प्रश्नांची उत्कटता मुलांमध्ये होती. या जिज्ञासेला चालना देत विज्ञान आणि गणितातील क्लिष्ट वाटणाऱ्या संकल्पना गमतीशीर, सोप्या आणि रंजक पद्धतीने मांडताना शास्त्रज्ञांच्या शोधांचा रोचक इतिहासही आज लहान मुलांसमोर उलगडण्यात आला. निमित्त होते पुणे बाल पुस्तक जत्रेतील विज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्तेवरील रंगलेल्या चर्चासत्राचे.
पुणे महापालिका, समर्थ युवा फाऊंडेशन आणि संवाद पुणे यांच्यावतीने गणेश कला क्रीडा मंच इथे पुणे बाल पुस्तक जत्रा सुरु आहे. काल यामध्ये बाल साहित्यिक राजीव तांबे यांचा “विज्ञान गप्पागप्पी’ हा कार्यक्रम तऱ़ डॉक़टर अमेय पांगारकर यांचा “ए आय तुमचा नवीन स्टडी बडी” या विज्ञान आधारित कार्यक्रमात पांगरकरांनी मुलांना ए आय अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्ता याची ओळख करून दिली. तसेच यावेळी कृत्रिम बुद्धिमत्तेशी निगडित असणाऱ्या विविध शाखांची माहिती प्रात्यक्षिकासह दिली.
आभासी आणि खरे जग कसं ओळखायचे हे सांगण्यासाठी त्यांनी मुलांना काही चित्रे ओळखायला सांगितली. याबरोबरच मुलांच्या अनेक मजेशीर प्रश्नांनाही त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
तत्पूर्वी बाल साहित्यिक राजीव तांबे यांनी आज मुलांना बोलते करत विज्ञानावर आधारित प्रश्न विचारत गमतीजमतीतुन विज्ञानाच्या क्लिष्ट संकलपना समजावुन सागितल्या. तसेच, चूक करण्याची संधी मुलांना दिली पाहीजे तरच चूकातुन शिकण्याची हिंमत मुलांना मिळते. अनेक घरांमध्ये मुले चूकली तर लगेच पालक तुटुन पडतात. मात्र चूक झाली तर ती न दाखवता काय बरोबर आहे हे सांगितले तर पुन्हा चूका होत नाही असेही खडे बोल राजीब तांबे यांनी पालकांना सुनवले. यानंतर जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या जादूच्या खेळांनी संध्याकाळच्या सत्राची सांगता झाली.
