पुणे : हसण्याची बाराखडी, ‘एआय’ची आभासी न्यारी दुनिया, कथा-कवितांचे रंगीत राज्य आणि विज्ञानाच्या विश्वातील गप्पाटप्पा अशा विविध उपक्रमांनी गेल्या पाच दिवसांत पुण्यातील बाल पुस्तक जत्रा गजबजून गेली. या जत्रेला ४५ हजारांहून अधिक मुलांनी भेट दिली, तर ९० हजारांहून अधिक पुस्तकांची विक्री झाली. या पुस्तक जत्रेत विज्ञानावर आधारित पुस्तकांना बालचमूंनी पसंती दिली.
हजारो चिमुकल्यांनी या जत्रेत केवळ मनोरंजनच नाही, तर विविध विषयांशी हसत-खेळत मैत्री केली. पुस्तकांच्या असंख्य दालनांतून फिरत त्यांनी नव्या कल्पनांचे, विचारांचे विश्व उलगडून पाहिले. समारोपाच्या दिवशी नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील वडांगळी तालुक्यातील मोहिनी भुसे हिने संबळवादन करत सर्वांना मंत्रमुग्ध केले. स्वरतरंग संगीत अकादमीच्या वतीने ४० मुलांनी बाल गीतरामायण सादर केले. तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात डॉ. श्रुती पानसे यांनी लहान मुलांचा स्क्रीन टाइम कसा कमी करावा, या विषयी मार्गदर्शन केले.
या जत्रेचे यंदाचे दुसरे वर्ष होते. पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका, समर्थ युवा फाउंडेशन आणि संवाद पुणे यांच्या वतीने या जत्रेचे आयोजन करण्यात आले. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ३० एप्रिल ते ४ मेपर्यंत झालेल्या या जत्रेत पुस्तकांच्या प्रदर्शनाबरोबरच विज्ञान गप्पा, कृत्रिम बुद्धिमत्ता मार्गदर्शन आणि लहान मुलांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शंभरहून अधिक पुस्तक दालनांनी सजलेल्या या जत्रेत मुलांसाठी ज्ञान, करमणूक आणि सर्जनशीलतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. तसेच, या जत्रेत ‘गीतरामायण’, पपेट शो, जादूचे प्रयोग, विविध साहसी आणि ग्रामीण खेळांची ओळख, मुलांचे कविसंमेलन, आवडत्या लेखकांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी अशा विविध आकर्षक उपक्रमांची मेजवानी लहानग्यांना मिळाली.
बाल पुस्तक जत्रेस ४५ हजारांहून अधिक मुलांनी भेट दिली, तर ९० हजारांहून अधिक पुस्तकांची विक्री झाली. या पुस्तक जत्रेत विज्ञानावर आधारित पुस्तकांची सर्वाधिक विक्री झाली, असे संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले.
