श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com
अभ्यासाबरोबरच मुलांचे व्यक्तिमत्त्व विकसित व्हावे म्हणून काम करणारी एक सामाजिक संस्था म्हणजे ‘बाल शिक्षण मंच.’ मार्केट यार्ड परिसरातील विविध वस्त्यांमध्ये राहणाऱ्या आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही संस्था अभ्यासिकेबरोबरच विविध उपक्रम राबविते. जे उपक्रम संस्थेतील मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकसनाला हातभार लावतात.
महर्षिनगर येथील मनपा शाळा क्रमांक ७८ मध्ये शाळा सुटल्यानंतर संध्याकाळच्या वेळी वर्गात अभ्यास करीत बसलेली मुले पाहिली की नक्कीच आश्चर्यचकित व्हायला होते. अभ्यासाचा ध्यास आणि शिक्षणाची आस असणारी विविध वस्त्यांमध्ये राहणारी ही पहिली ते बारावीपर्यंतची मुले. त्यांना अभ्यास तर करायचा आहे, पण बसायला जागा नाही. हा प्रश्न सोडविण्याबरोबरच मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकसनाला हातभार लावला जाईल असे कार्य करायचे बाल शिक्षण मंच या संस्थेने ठरविले आणि बारा वर्षांपूर्वी आपल्या कार्याला सुरुवात केली.
महर्षिनगरमधील या शाळेत मोफत अभ्यासिकेबरोबरच येथे येणाऱ्या मुलांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन तसेच व्यक्तिमत्त्व विकासाचे अनेक उपक्रम वर्षभर चालवले जातात. महर्षिनगर, औद्योगिक वसाहत, इंदिरानगर, डायस प्लॉट, आंबेडकरनगर, प्रेमनगर या वस्त्यांमधील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे साधारणपणे तीस ते चाळीस विद्यार्थी नियमितपणे येथे येतात. या वर्गाची वेळ ही सायंकाळी ६ ते ९ अशी असते. त्यामुळे वर्षभर मुले येथे अभ्यासाला येतात. ते आपापला गृहपाठ करतात, वाचन करतात आणि त्यांना असलेल्या अडचणी तज्ञ स्वयंसेवकांमार्फत सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सभा घेतल्या जातात. त्यांना दहावी-बारावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी सहकार्य आणि मार्गदर्शन केले जाते, त्यांच्या शिक्षणामध्ये कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक अडथळा येऊ नये म्हणूनदेखील सहकार्य केले जाते. अभ्यासिकेतील मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्याबरोबरच त्यांच्या कौटुंबिक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. जेणेकरून हे सर्व विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहतील. अभ्यासिकेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने निदान पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करावे अशी धारणा आहे. त्यासाठी अभ्यासिकेचे कार्यकर्ते प्रयत्नशील असतात.आतापर्यंत अभ्यासिकेचे अनेक विद्यार्थी पदवी पूर्ण करून विविध ठिकाणी कार्यरत आहेत. काही विद्यार्थिनी बँकेमध्ये कार्यरत आहेत तर काही विद्यार्थी सामाजिक कार्याची पदवी घेऊन विविध सामाजिक संस्थांमध्ये रचनात्मक कार्य करत आहेत. अमर पोळ यांनी या सगळ्या उपक्रमांना २००६ मध्ये सुरुवात केली आणि २००९ साली संस्थेची अधिकृत नोंदणी करण्यात आली. मुलांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे म्हणून ते सतत प्रयत्नशील असतात.
वर्षभरामध्ये या अभ्यासिकेबरोबरच काही उपक्रम राबविले जातात. उन्हाळ्याच्या सुटीमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन संस्थेमार्फत करण्यात येते. मुलांना आपल्या वस्तीच्या भागातून बाहेर काढून त्यांना योग्य रीतीने संस्कारित करण्यासाठी मे महिन्यामध्ये दहा दिवसांचे विशेष उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात येते. यामध्ये ग्राम स्वच्छता, आरोग्य जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, साक्षरता प्रसार यांसारखे कार्यक्रम गावात घेतले जातात.
जून महिन्यामध्ये ‘आम्ही उद्याचे शिल्पकार’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते, तर विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी मार्गदर्शन केले जाते. दिवाळीच्या वेळी ‘ प्रज्ज्वलित दीपोत्सव’ हा उपक्रम संस्थेमार्फत राबविला जातो. यात दीपावलीच्या निमित्ताने शहरातील अनाथ, अपंग, अंध अशा विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांच्यासाठी दिवाळी साजरी केली जाते. आद्य शिक्षण क्रांतिकारक महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शहरातील दहा विविध विभागातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. याशिवाय मुलांसाठी अनेक चित्रपटांचे आयोजन करणे, त्यांच्यासाठी विविध विषयांची व्याख्याने आयोजित करणे, त्यांना अभ्यास सहलींसाठी घेऊन जाणे, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या मुलाखतीसाठी मुलांना तयार करणे हे आणि असे विविध उपक्रम संस्थेमार्फत वर्षभर राबिवले जातात.
बाल शिक्षण मंचाच्या मार्फत काही सामाजिक कार्य करायचे असेल किंवा कोणत्याही प्रकारचा हातभार लावायचा असेल तर अमर पोळ यांच्याशी ९३७३३२२०२४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. वस्तीपातळीवर मुलांच्या अनेक समस्या असतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे शैक्षणिक प्रोत्साहन. विद्यार्थ्यांना जर शैक्षणिक प्रोत्साहन आणि शैक्षणिक मार्गदर्शन मिळाले नाही तर शिक्षण पूर्ण करण्यावर मर्यादा येतात आणि त्यामुळे संस्थेने मुख्य उद्देश शैक्षणिक मार्गदर्शन हा ठरवला असून आतापर्यंत अभ्यासिकेतील बहुतांश विद्यार्थी पदवी पूर्ण करू शकलेले आहेत.