पुणे : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना पुस्तक भेट देण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या वाचनाला चालना देण्यासाठी ६६ हजार शाळांना सहा पुस्तकांचा संच देण्यात येणार असून, सर्वसामान्य वाचकांनाही हा संच खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

सन २०२६-२७ हे बालभारतीचे हीरक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने बालभारतीच्या उद्दिष्टांना अनुसरून शैक्षणिक आणि विद्यार्थी उपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने जानेवारीमध्ये बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांच्या निवडक मुखपृष्ठांचे प्रदर्शन, बालभारतीच्या गीताची निर्मिती, पाच पाठ्येतर पुस्तकांचे प्रकाशन असे उपक्रम करण्यात आले होते. आता त्या पुढे जाऊन विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी बालभारतीने पुढाकार घेऊन अवांतर वाचनासाठी विशेष पुस्तक संचाची निर्मिती केली आहे. नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर या पुस्तक संचाचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना वितरण केले जाणार आहे.

किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी पुस्तक संचातील पुस्तकांचे संपादन केले आहे. ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या भावविश्वाचा विचार करून पुस्तक संचातील पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात किशोरमध्ये प्रकाशित झालेल्या कथा कविता, बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांतील साहित्य समाविष्ट करण्यात आले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुमारे ६६ हजार शाळांना हा संच उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना ही पुस्तके सुलभरीत्या उपलब्ध होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची गोड लागण्यास मदत होईल. तसेच, हा संच बालभारतीच्या भांडारांमध्ये, संकेतस्थळाद्वारे सर्वसामान्यांनाही उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे हा पुस्तक संच मोठ्यांसाठीही स्मरणरंजन ठरणार आहे.

पुस्तक संचात कोणत्या पुस्तकांचा समावेश?

बालभारतीने तयार केलेल्या पुस्तक संचामध्ये मान्यवर कवींच्या गाजलेल्या कवितांचा समावेश असलेल्या ‘बालभारतीच्या कविता’, ‘स्फूर्तीगीते’, ‘५० किशोर गोष्टी’ (दोन भाग), ‘चित्रकथा’, ‘थोरांची ओळख’ तसेच ‘माझा पहिला इंग्रजी-मराठी शब्दकोश’ या पुस्तकांचा समावेश आहे. त्यामुळे कविता, गोष्टी, प्रेरणादायी गीते, चित्रकथा आणि संत-महापुरुषांची माहिती असे वैविध्यपूर्ण साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे.

बालभारतीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना पुस्तक भेट देण्यात येणार आहे. त्यासाठी सहा पुस्तकांचा संच तयार करण्यात आला आहे. – अनुराधा ओक