राज्याच्या अभ्यासक्रमावर खासगी संस्थांकडून तयार करण्यात आलेल्या ई-लर्निग साहित्याची पडताळणी बालभारतीकडून सुरू झाली आहे. प्रत्यक्षात बाजारात अनेक खासगी कंपन्यांचे असे ई-साहित्य उपलब्ध असले, तरी प्रत्यक्षात ते तपासून घेण्यासाठी १४ संस्थांनीच अर्ज केला आहे. त्यामध्येही सध्या आघाडीवर असलेल्या कंपन्या नसल्याचेच दिसत आहे.
राज्याच्या अभ्यासक्रमावर आणि बालभारतीने तयार केलेल्या पाठय़पुस्तकांवर आधारित ई-साहित्याची अनेक संस्था निर्मिती करत असतात. या संस्थांना त्यांनी तयार केलेल्या साहित्याची पडताळणी करून घेणे आता शासनाने बंधनकारक केले आहे. या पडताळणीचे काम आता सुरू झाले आहे. सध्या बालभारतीची विषयानुरूप असलेली अभ्यासमंडळे या साहित्याची तपासणी करणार आहेत. पाठय़पुस्तकातील मजकुराचा अपेक्षित असलेला आशयच ई-साहित्यातून पोहोचतो आहे का? वापरलेली दृश्ये, चित्रं यांमध्ये काही आक्षेपार्ह आहे का याची पडताळणी बालभारती करत आहे.
सध्या बाजारात शेकडो कंपन्या ई-साहित्याची निर्मिती करत आहेत. अनेक कंपन्या प्रत्यक्षात सीडीच्या माध्यमातून ई-साहित्याची निर्मिती करण्याऐवजी ऑनलाइन साहित्य उपलब्ध करून देत आहेत. असे असताना प्रत्यक्षात मात्र १४ कंपन्यांनीच या साहित्याची तपासणी करून घेण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यामध्येही सध्या बाजारपेठेत आघाडीवर असणाऱ्या कंपन्यांचे साहित्य अजून तपासणीसाठी आलेलेच नाही. त्यातील काही कंपन्यांचे साहित्य हे सामाजिक उत्तरदायित्व म्हणून कंपन्यांनी शाळांमध्ये मोफत वाटलेही आहे.
एकीकडे सर्व संस्थांना पाठय़पुस्तकावर आधारित ई-साहित्याची तपासणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले असले, तरी तपासणी करून न घेणाऱ्या संस्थांच्या साहित्याचे काय करायचे याचा आराखडा मात्र अद्यापही तयार नाही. याबाबत बालभारतीचे संचालक चंद्रमणी बोरकर यांनी सांगितले, ‘प्रत्येक विषयानुसार बालभारतीची अभ्यासमंडळे आहेत. ती संबंधित विषयाच्या साहित्याची तपासणी करत आहेत. सध्या १४ प्रस्ताव असले, तरी ते येत्या काळात वाढू शकतील. त्या प्रमाणे ही तपासणी सुरूच राहील. साहित्यात काय पाहावे त्याबाबत अभ्यासमंडळे निर्णय घेतील.’