पुणे : राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी असताना अद्याप नव्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांची छपाई सुरू आहे. पाठ्यपुस्तकांच्या अंतिम मान्यतेला शिक्षण विभागाच्याच स्तरावर विलंब झाल्याचा परिणाम इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकाच्या निर्मितिप्रक्रियेवर झाला आहे. मात्र, इयत्ता सहावीच्या मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांची पाठ्यपुस्तके, तसेच इयत्ता दुसरी, तिसरी, चौथीची पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे ‘बालभारती’चे नियोजन आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आता नवा अभ्यासक्रम, नवीन पाठ्यपुस्तके तयार करण्यात येत आहेत. त्यात गेल्या वर्षी इयत्ता पहिलीला नव्या अभ्यासक्रमानुसार नवीन पाठ्यपुस्तके लागू करण्यात आली. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची पाठ्यपुस्तके लागू होणार आहेत. पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीसाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने तयार केला आहे, तर पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळावर (बालभारती) आहे. पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी तज्ज्ञ समित्यांची नियुक्ती, उद्बोध वर्गांचे आयोजन करण्यात आले होते. पाठ्यपुस्तकांचा आशय तयार झाल्यावर गाभा समिती, वैधानिक परीक्षण, समन्वय समिती मान्यता अशा टप्प्यांतून पुस्तकांची निर्मिती करण्यात आली. मात्र, अभ्यासक्रमाला मान्यता, पाठ्यपुस्तकांच्या अंतिम मान्यतेला विलंब झाल्याने इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकांच्या छपाईला विलंब झाला.
इयत्ता दुसरी, तिसरी, चौथीची बहुतांश पाठ्यपुस्तके तयार झाली आहेत. उर्वरित पुस्तकांची प्रक्रिया पूर्ण करून वितरण केले जाणार आहे. तर इयत्ता सहावीच्या काही विषयांची पुस्तके तयार आहेत. १५ जून रोजी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी दुसरी, तिसरी, चौथी या इयत्तांसह सहावीची मराठी, इंग्रजी, उर्दू या माध्यमांची पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना देण्याचे नियोजन बालभारतीने केले आहे.
पहिल्यांदाच एका वर्षी चार इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती
राज्यात शालेय अभ्यासक्रमात नव्याने बदल झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बालभारतीकडून पाठ्यपुस्तके तयार केली जातात. त्यानुसार, एका वर्षी एक किंवा दोन इयत्तांची पाठ्यपुस्तके तयार केली जातात. मात्र, बालभारतीच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच एका वर्षी चार इयत्तांची पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत.
बालभारतीच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वर्षी चार इयत्तांची नवी पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या पाठ्यपुस्तकांना मिळालेल्या मंजुरीनुसार छपाईचे काम सुरू करण्यात आले. १० माध्यमांतील ३४८ पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. छपाई झालेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या चार इयत्तांची सर्व माध्यमांची, सर्व विषयांची पाठ्यपुस्तके ३० जूनपर्यंत विद्यार्थ्यांना मिळतील. – अनुराधा ओक, संचालक, बालभारती
