पुणे : आकर्षक चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला अनुरूप कृतियुक्त शिक्षण, उपक्रम, खेळाच्या माध्यमातून मुलभूत संकल्पना समजावून देण्यावर इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या नव्या पाठ्यपुस्तकात भर देण्यात आला आहे. या पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती साध्य करण्याचे उद्दिष्ट असून, नवी पाठ्यपुस्तकांचा दर्जा ‘सीबीएसई’च्या शाळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकांपेक्षा सरस असल्याचा विश्वास बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार राज्य मंडळाच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी नव्या अभ्यासक्रमानुसार नवी पाठ्यपुस्तके तयार करण्यात येत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७मध्ये इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, सहावी या इयत्तांसाठीची नवी पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. ‘सीबीएसई’च्या धर्तीवर अभ्यासक्रमाचा स्तर उंचावण्यावर भर देण्यात आला आहे. नवी पाठ्यपुस्तके तयार करताना विद्यार्थ्यांच्या भावविश्वाचा विचार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील संकल्पना सुलभ पद्धतीने समजावण्यावर भर देण्यात आला आहे. नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये कविता, गोष्टी, चित्रकथा, अक्षरे, स्वरचिन्हे, वाचन पाठ, भाषिक आणि गणितीय कोडी, खेळ आणि कृती, वैज्ञानिक संकल्पना गोष्टीरूप स्वरुपात विद्यार्थ्यांना नव्याने शिकायला मिळणार असल्याची माहिती ‘बालभारती’च्या विषयतज्ज्ञांनी दिली.
पाठ्यपुस्तकांमध्ये त्या-त्या इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या वयानुरूप आशयाची निवड केली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात नमूद केल्यानुसार प्रत्येक इयत्तेला अपेक्षित असलेल्या अध्ययन निष्पत्ती पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. भारतीय ज्ञान प्रणालीतील संकल्पनांचाही समावेश नव्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकातील चित्रे प्रामुख्याने चित्रकारांकडून काढून घेण्यात आली आहेत. काही ठिकाणी मूळ छायाचित्रे वापरण्यात आली आहेत. त्यामुळे आशयाला समर्पक चित्रे, छायाचित्रांची जोड देऊन अत्यंत आकर्षक पद्धतीने, विद्यार्थ्यांच्या भावविश्वाचा विचार करून पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे, असेही ओक यांनी सांगितले.
शिक्षकांसाठी पाठ्यपुस्तकात मार्गदर्शन
पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीलाच अध्ययन निष्पत्ती आणि पाठ्यपुस्तकातील आशय यांचा समन्वय दर्शवणारा तक्ता देण्यात आला आहे. तसेच प्रत्येक पाठ, आशय, उपक्रम, अपेक्षित कृती या अनुषंगाने शिक्षकांसाठीच्या सूचना समाविष्ट करण्यात आल्या आहेत, असेही ओक यांनी नमूद केले.
