पुणे : महापालिकेच्या विकास आराखड्यात (डीपी) प्रस्तावित करण्यात आलेल्या बालभारती ते पौड फाटा रस्त्याच्या कामासाठी महापालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. पर्यावरण विभागाचे प्रमाणपत्र (ईसी) मिळविण्यासाठी सल्लागार नियुक्त केला जाणार आहे.यासाठी सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिकेने नियुक्त केलेल्या सल्लागाराने पर्यावरण विभागाचे प्रमाणपत्र मिळवून दिल्यानंतर या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
कर्वे रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपयुक्त असलेल्या बालभारती ते पौड फाटा रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. या रस्त्याच्या कामाला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याचे काम थांबले आहे. या रस्त्याच्या कामाविराेधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या रस्त्याबाबत महापालिकेने न्यायालयात प्रतिज्ञापत्रदेखील दिले आहे.
न्यायालयाने यावर एक समिती स्थापन केली असून, सुमारे ३० मीटर रुंदीच्या या रस्त्याच्या कामासाठी पर्यावरण विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एन्व्हायराेमेंटल क्लिअरन्स सर्टिफिकेट) घ्यावे, अशा सूचना दिल्या आहेत. ‘स्टेट एन्व्हायर्मेंट इम्पॅक्ट असेसमेंट कमिटीला’ या प्रकरणी सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर आता महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
पर्यावरण विभागाचे प्रमाणपत्र (ईसी) मिळविण्यासाठी पथ विभागाने सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमाेर ठेवला हाेता. यासाठी गेल्या वर्षी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निविदेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने फेरनिविदा काढली गेली. या निविदा प्रक्रियेत ‘आदित्य एन्व्हायर्मेंटल सर्व्हिसेस प्रा. लि.’ एकाच कंपनीने सहभाग घेतला. त्यामुळे ही कंपनी निविदेसाठी पात्र ठरली. संबंधित कंपनीने सुमारे १ काेटी २८ लाख रुपयांची निविदा सादर केली. तसेच, अंदाजपत्रकात या कामासाठी दाेन काेटी रुपयांची तरतूद केली आहे.
हा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्याला बैठकीत मान्यता दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. या सल्लागाराच्या माध्यमातून पर्यावरणाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया राबविता येणार आहे, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
पर्यावरणवाद्यांचा विरोध का ?
बालभारती ते पौड फाटा हा रस्ता करताना टेकडी फोडली जाणार आहे, त्यामुळे येथील नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण होणार असल्याचा दावा पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून केला जात आहे. हा रस्ता होऊ नये, यासाठी पर्यावरणप्रेमी नागरिक प्रयत्नशील आहेत. हा रस्ता झाल्यास आणि तिथून वाहतूक सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रदूषण होईल याचा परिणाम आजूबाजूच्या नैसर्गिक साधन संपत्तीवर होईल. त्यामुळे या रस्त्याला विरोध केला जात आहे. पर्यावरण प्रेमींच्या या विरोधामुळे रस्ता तयार करण्याच्या खर्चात अनेक कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
