पुणे : संगीत रंगभूमीवरील नटसम्राट बालगंधर्व यांच्या वापरातील तानपुरा संगीत परंपरेचे जतन व संवर्धन करणाऱ्या गोपाळ गायन समाज संस्थेच्या शतकोत्तर वाटचालीच्या निमित्ताने भेट देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महात्मा गांधींच्या ‘टिळक पैसा फंड’च्या निधी संकलनासाठी १९२१ मध्ये झालेल्या संयुक्त ‘संगीत मानापमान’च्या प्रयोगावेळी संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी बालगंधर्व यांना भेट दिलेला हा तानपुरा गेली १०५ वर्षे परांजपे कुटुंबीयांनी जतन करून सुस्थितीत ठेवला आहे.
टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात गुरुवारी (२३ जुलै) सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या स्वरमैफलीच्या प्रारंभी बालगंधर्व यांचा तानपुरा गोपाळ गायन समाज संस्थेला भेट देण्यात येणार आहे, अशी माहिती तानपुरा जतन करणारे प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे यांनी दिली.
डॉ. रामचंद्र परांजपे यांच्या मातोश्री कमलाबाई परांजपे या गोपाळ गायन समाजात पं. गोविंदराव देसाई यांच्याकडे संगीत शिकत होत्या. प्रत्येक गोकुळाष्टमीला उत्सवात त्यांचे गायन होत असे. १९२१ मध्ये मुंबईमध्ये संयुक्त ‘मानापमान’चा प्रयोग झाला होता. त्यावेळी संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी आपला तानपुरा बालगंधर्वांना सप्रेम भेट दिला होता. बालगंधर्व पुण्यात आले बापूसाहेब व कमलाबाई परांजपे यांच्याकडे उतरत असत. तसेच त्यांना नाट्यपदे शिकवत असत. त्यावेळी केशवरावांचा तानपुरा बालगंधर्वानी परांजपे दाम्पत्याकडे दिला होता. त्यांचे पुत्र डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे यांनी तो जतन केला आहे. हाच ऐतिहासिक ठेवा गोपाळ गायन समाजाला भेट म्हणून देण्यात येणार आहे. शंभराहून अधिक वर्षे उलटून गेली तरी देखील आजही तो तानपुरा देखणा व उत्तम स्थितीत आहे, असे गोपाळ गायन समाजाचे डॉ. विकास कशाळकर यांनी सांगितले.
पं. गोविंदराव देसाई हे संगीतोद्धारक पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे पट्टशिष्य. गुरूंच्या आदेशानुसार त्यांनी पुण्यामध्ये संगीताच्या प्रसाराचे कार्य सुरू केले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रेरणेने त्यांनी १९२६ मध्ये गोपाळ गायन समाजाची स्थापना करून स्वतःचा संगीत अभ्यासक्रम सुरु केला होता.
गोपाळ गायन समाजच्या शतकोत्तर उत्सवाचा प्रारंभ कमलाबाई परांजपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘रंगबहार’ या नाटयगीतांच्या कार्यक्रमाने होणार आहे. सूरगंधर्व सुरेश साखवळकर, बकुळ पंडित, केदार केळकर, अस्मिता चिंचाळकर, अभिनेत्री गात, रवींद्र कुलकर्णी व संजय गोगटे (ऑर्गन), केदार कुलकर्णी (तबला) यांचा सहभाग यामध्ये आहे.
