‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ ही कवी केशवसुतांची काव्यपंक्ती शब्दश: मनावर घेऊन पुणे शहर पुनर्विकासित होत आहे. जुन्या देखण्या इमारती, टुमदार बंगल्यांच्या जागांवर टोलेजंग इमारती उभ्या राहत असून, हा बदल ठिकठिकाणी दिसतो. बालगंधर्व रंगमंदिर या पुण्याचे वैभव असलेल्या वास्तूच्या पुनर्विकासाचा मुद्दा याच रांगेतला. त्याला भिडताना केशवसुतांच्या तुतारी कवितेतील पुढच्या ओळी, ‘प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा’ या लक्षात ठेवणार का आणि पुनर्विकास करताना मूळ वास्तूची कलात्मकता जतन करण्याचे शहाणपण महापालिका प्रशासन दाखविणार का, हे खरे प्रश्न.
आयुक्तांच्या प्रस्तावित अर्थसंकल्पात बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकास व नूतनीकरणाचा प्रकल्पाचा समावेश आहे. त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून चर्चेत असलेल्या या पुनर्विकासाचा ‘नवा अंक’ सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मिती करण्यात आलेल्या आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या वास्तूचे भविष्य काय असेल, पुनर्विकास होताना मूळ वास्तू पाडली जाणार का, या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी काही काळ जरूर द्यावा लागेल.
बालगंधर्व रंगमंदिर १९६८ मध्ये सुरू झाले होते. काळाच्या ओघात नाट्यगृहातील सुविधा जुन्या झाल्याने नाट्यगृहाचे आधुनिकीकरण आणि पुनर्विकास करण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याचे सांगत बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकास आणि नूतनीकरणाचा प्रकल्प अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आला आहे. या पुनर्विकासाची चर्चा सध्या केंद्रीय मंत्री असलेले मुरलीधर मोहोळ महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असताना सुरू झाली. त्यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे सांगितले होते. मात्र, रंगकर्मींनी विरोध केल्यानंतर काही काळ हा प्रकल्प बासनात गुंडाळण्यात आला.
पुनर्विकास प्रकल्पाच्या आराखड्यानुसार, नाट्यगृहात १८०० आसनक्षमतेची तीन आधुनिक प्रेक्षागृहे, अत्याधुनिक रंगमंच व ध्वनी-प्रकाशव्यवस्था, कलाकारांसाठी सुधारित रंगभूषा व वेशभूषा खोल्या, आधुनिक शौचालये, तसेच पाणीपुरवठा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, वातानुकूलन व सुरक्षा व्यवस्था, अधिक क्षमतेचा वाहनतळ, सुशोभीकरण, परिसराचे सौंदर्यीकरण व अन्य सांस्कृतिक सुविधा आदी कामांचा समावेश आहे. आता अर्थसंकल्पातच याचा समावेश झाल्याने वर्षभरात पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या २०१८-१९ मधील अर्थसंकल्पात या पुनर्विकासाची घोषणा झाली होती. त्या वेळी या प्रस्तावाला विरोध झाला असला, तरी महापालिकेने या संदर्भात पदाधिकारी, अधिकारी, कला क्षेत्रातील तज्ज्ञ, कलाकार यांची समिती स्थापन केली होती. वास्तुविशारदांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. आठ वास्तुविशारदांनी महापालिकेत सादरीकरणदेखील केले होते. त्यातील एक प्रस्ताव महापालिकेने अंतिम केल्यानंतर त्यावर काम सुरू झाले. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर सादरीकरण झाल्यानंतर त्यांनी काही महत्त्वाचे बदल सुचविले. त्यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील जिओ मॉलची पाहणी केली होती. त्यानुसार ठरवलेल्या आराखड्यात बदलही करण्यात आले होते. मात्र, २०२२नंतर तो प्रस्ताव बारगळला.
‘बालगंधर्व’च्या पुनर्विकासाची चर्चा नव्याने झडत असताना परदेशांतील हे काही पूरक दाखले. इंग्लंडमध्ये विल्यम शेक्सपीअरचे सोळाव्या शतकातील निवासस्थान अजूनही दिमाखात उभे असून, पर्यटकांचे ते आकर्षण आहे. त्याला कधीच डागडुजी लागलीच नाही, असे अजिबात नाही. पण, ती वेळोवेळी निगुतीने केली गेली. एकोणिसाव्या शतकात शेक्सपीअर बर्थप्लेस ट्रस्टने त्याचे जतन-संवर्धन केले. हाच ट्रस्ट अजूनही त्याची देखभाल करतो. गेल्याच वर्षी त्याची काही डागडुजी झाली. फ्रान्स, जर्मनी आदी युरोपीय देशांमध्येही जुन्या वास्तू, अगदी रेल्वे स्थानकेही अशाच पद्धतीने जतन करून ठेवण्याचा वारसा दिसतो. आपल्याकडेही वारसा वास्तू जतन करताना त्याचा सरसकट पुनर्विकास करता येत नाही. आता बालगंधर्व रंगमंदिर वारसा वास्तूंच्या यादीत नाही. पण, तरी ती वास्तू संगीत नाटकांच्या सुवर्णस्मृती देणाऱ्या श्रेष्ठ गायक-नटाच्या नावे सौंदर्यदृष्टी ठेवून उभारलेली आहे. त्यामुळे सांस्कृतिक शहराचे बिरूद मिरविणाऱ्या पुण्याने रंगमंदिर सरसकट पाडून पुनर्विकास करण्याऐवजी तेही वारसा वास्तू समजून जतन-संवर्धनाचा मार्ग अवलंबायला काय हरकत आहे?
vidyadhar.kulkarni@expressindia.com
