नटसम्राट बालगंधर्व यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराचे भूमिपूजन करण्यात आले होते. तर पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेमधून याची भव्य वास्तू साकारण्यात आली. त्यामुळे ही ऐतिहासिक वास्तू पाडण्याच्या निर्णयाला आमचा विरोध आहे, अशी भूमिका बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी हे देखील उपस्थित होते.

सुरेश साखवळकर म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिराच्या मुळ वास्तूला कोणत्याही प्रकारचा हात न लावता. त्याच्या बाजूने कॉलम उभारण्यात यावेत तसेच नवीन बांधकाम करावे किंवा बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरातील मोकळ्या जागेवर बांधकाम करावे. जर ही वास्तू पाडण्याच्या भूमिकेवर प्रशासन ठाम असेल तर आमचा त्याला तीव्र विरोध राहणार आहे. त्याचबरोबर ही वास्तू वाचवण्यासाठी प्रशासनाविरोधात आम्ही लढा उभारू, असा इशारा यावेळी बालगंधर्व संगीत रसिक मंडळाने दिला.

मेट्रोच्या प्रस्तावित स्कायवॉक आणि पार्किंगसाठी शहराचे सांस्कृतिक वैभव असलेली आणि सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदापर्ण करणारी बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडून तेथे बहुमजली संकुल उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. नियोजित मेट्रो प्रकल्पाला पूरक ठरेल अशी बहुमजली इमारत उभारण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहितीही पुढे आली आहे. त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास प्रस्तावित आहे.

या कामासाठी दहा कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. पुनर्विकास करताना बालगंधर्व रंगमंदिराची जुनी वास्तू पाडण्यात येणार असून तेथे सुसज्ज अत्याधुनिक सेवांनी युक्त असे बहुमजली संकुल उभारण्यात येणार आहे. या निर्णयाचे शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात तीव्र पडसाद उमटत आहेत. बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याला विरोध करण्यात येत आहे.