कलावंताच्या सर्जनशील अभिव्यक्तीवर नैतिक धोरणांच्या माध्यमातून सेन्सॉर बोर्डाने बंधने लादणे सर्वस्वी चुकीचे आहे. शिव्या हा समाजाचा एक अपरिहार्य भाग आहे. शिव्यांना अनैतिक ठरवायचे झाले तर अगदी शेक्सपीअरपासूनचे निम्मेअधिक साहित्य हद्दपार करावे लागेल. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटांतील शिव्यांवर बंदी घालणे हे मूर्ख मध्यमवर्गीय धर्मनिष्ठतेचे लक्षण असल्याची टीका ज्येष्ठ नाटककार-दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांनी रविवारी केली. साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे ‘स्ट्रक्चर ऑफ प्ले’ या विषयावर गिरीश कर्नाड यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. चित्रपटात वापरू नयेत अशा शिव्यांची यादीच सेन्सॉर बोर्डाने नुकतीच जाहीर केली आहे याकडे लक्ष वेधले असता गिरीश कर्नाड म्हणाले, सेन्सॉर बोर्डाने असे नियम करणे हास्यास्पद आणि धोकादायक आहे. खजुराहो येथील शिल्पांबाबत काय बोलणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ सन्मान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत माझ्या मनात नेमाडे यांच्याविषयी आदराची भावना असल्याचे कर्नाड यांनी सांगितले. सलमान रश्दी यांच्या वक्तव्यावर नेमाडे यांनी भाष्य करायला नको होते. प्रेक्षक वाढविणे ही नाटककाराची जबाबदारी असते तसे वाचक वाढविणे ही लेखकाची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.अगदी शेक्सपीअरपासूनच्या साहित्यामध्ये शिव्यांचा वापर झालेला आहे. लीला सॅमसन यांच्या अध्यक्षतेखालील सेन्सॉर बोर्डाने संवेदनशीलपणे कामकाज केले होते. दिल्ली बेली, हैदर अशा चित्रपटांना त्यांनी वेगळय़ा पद्धतीने हाताळले होते. समाजाचा अविभाज्य भाग असलेल्या शिव्यांना अनैतिक कोणी ठरवायचे हा खरा प्रश्न आहे.