शहरात सातत्याने निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर उपाय काढण्याच्या दृष्टीने महापालिकेने कृती कार्यक्रम सुरू केला असून कॅरिबॅग तसेच प्लॅस्टिकचे आणि थर्माकोलचे पेले, कप, थाळ्या आदींवर पूर्णत: बंदी घालण्याचा ठराव महापालिकेच्या मुख्य सभेत शुक्रवारी एकमताने मंजूर करण्यात आला. पन्नास मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या पिशवीला प्रतिपिशवी पंधरा रुपये दर आकारण्याचीही सक्ती शहरात लागू करण्यात आली आहे.
गेला महिनाभर शहरापुढे कचऱ्याची गंभीर समस्या उद्भवली होती आणि त्याचवेळी प्लॅस्टिक वापरावर र्निबध आणण्याची चर्चा सुरू झाली. मुख्य सभेत शुक्रवारी त्या संबंधीची उपसूचना नगरसेवक बाबू वागसकर आणि सतीश म्हस्के यांनी दिली होती. ती सभेत एकमताने मंजूर करण्यात आली. मुख्य सभेने घेतलेल्या निर्णयानुसार पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या (पातळ) प्लस्टिक पिशव्या (कॅरिबॅग) यापुढे सशुल्क अथवा नि:शुल्क तत्त्वावर वापरता येणार नाहीत. या पिशव्यांचा वापर बेकायदेशीर ठरवण्यात आला असून या पिशव्यांचा वापर वा विक्री वा साठा केल्याचे आढळल्यास संबंधितांना दंड करण्यात येईल. पहिल्या वेळी पाच हजार, तीच व्यक्ती दुसऱ्या वेळी पिशव्यांचा वापर करताना आढळल्यास दहा हजार आणि तिसऱ्या वेळी २५ हजार रुपये व खटला अशा प्रकारे कारवाई होईल.
पन्नास मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या पिशव्या शहरात वापरता येतील. मात्र, अशा पिशव्यांच्या वापराबाबतही नियम तयार करण्यात आले आहेत. या पिशव्या यापुढे पंधरा रुपयांना एक याप्रमाणे ग्राहकाला खरेदी कराव्या लागतील. तसेच अशा पिशव्यांची नोंद बिलामध्ये स्वतंत्रपणे करण्याचे बंधन विक्रेत्यावर राहील. जे व्यापारी बिलामध्ये नोंद न करता अशा पिशव्या ग्राहकांना देतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. प्लॅस्टिक तसेच थर्माकोलचे कप, थाळ्या, पेले यांच्या वापरावर तसेच विक्री व साठय़ावरही र्निबध आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत.

बंदी कशाकशावर?
– पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या (पातळ) कॅरिबॅगवर
– थर्माकोलचे पेले, थाळ्या, कप
– प्लॅस्टिकचे कप, पेले, ताटल्या
– कोणतीही प्लॅस्टिकची पिशवी यापुढे मोफत नाही
– जाड प्लॅस्टिक पिशवीचा दर यापुढे प्रतिपिशवी पंधरा रुपये