पुणे : आषाढी एकादशीच्या उपवासामुळे केळींच्या मागणीत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एक डझन केळींना प्रतवारीनुसार ६० ते ८० रुपये दर मिळाले आहेत. श्रावण महिन्यात केळींच्या मागणीत आणखी वाढ होणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर, भिगवण, तसेच पंढरपूर, अकलूज भागातील शेतकऱ्यांकडून केळींची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील केळी बाजारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केळी विक्रीस पाठविली. फळ विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली. घाऊक बाजारात कच्च्या केळींना प्रतिकिलो १० ते १६ रुपये दर मिळाले. पक्व केळींच्या १८ किलोच्या प्लास्टिक जाळीला (क्रेट) ३०० ते ४०० रुपये दर मिळाले. किरकोळ बाजारात एक डझन केळींना प्रतवारीनुसार ६० ते ८० रुपये असे दर मिळाले, अशी माहिती केळी बाजारातील व्यापारी विठ्ठल वायकर यांनी दिली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत कच्च्या आणि पक्व केळींच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात दररोज १५ ते २० टेम्पोतून केळींची आवक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड भागातून होत आहे, असे त्यांनी सांगितले.
श्रावणात नवीन हंगाम सुरू
बाजारात सध्या जुन्या केळींची आवक होत आहे. श्रावण महिन्यात सर्वाधिक मागणी असते. श्रावण महिन्यात नवीन केळींंचा हंगाम सुरू होईल. गेल्या हंगामात पाऊस चांगला झाला. लागवड चांगली झाल्याने येत्या काही दिवसांत आवकही वाढेल. आवक आणि मागणी विचारात घेऊन केळींचे घाऊक बाजारातील दर निश्चित केले जातील. जळगावमधून पुण्यातील बाजारात केळींची आवक होते. मात्र, सध्या तेथून फारशी आवक होत नाही. पुणे जिल्ह्यातील इंदापूर, भिगवण, अकलूज, पंढरपूर भागात शेतकरी मोठ्या प्रमाणावर केळींची लागवड करतात. पुणे विभागातील शेतकऱ्यांसाठी मार्केट यार्ड ही जवळची बाजारपेठ आहे. पुण्यातील बाजारात चांगले दर मिळत असल्याने या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर केळी विक्रीस पाठवितात, असे केळी व्यापारी विठ्ठल वायकर यांनी नमूद केले.