पुणे : वनराज आंदेकरच्या खुनाचा सूड उगविण्यासाठी बंडू आंदेकरने कारागृहात राहून खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे करण्यास साथीदारांना चिथावणी दिल्याचे तपासात उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी बंडू आंदेकरचा साथीदार, नातेवाईकांशी होणाऱ्या भेटीगाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदेकरला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात येणार नसून, यापुढील काळात न्यायालयीन कामकाजासाठी आंदेकरला ‘व्हिडीओ काॅन्फरसिंग’ची सुविधा वापरली जाणार आहे.

या बाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी राज्य कारागृह विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याला कारागृहात वेगळे ठेवणे, न्यायालयात होणाऱ्या नातेवाईकांच्या भेटीगाठींवर निर्बंध आणणे, कारागृहातून नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी दिलेली दूरध्वनी सेवेचा वापर करण्यास मज्जाव करणे, न्यायालयीन सुनावणीसाठी (तारीख) प्रत्यक्ष हजर न करता व्हिडीओ काॅन्फरसिंग सुविधेद्वारे हजर करण्यात यावे, अशी मागणी पोलीस आयुक्त अमितेशकुमार कारागृह प्रशासनाकडे केली आहे.

पोलिसांनी कारागृह प्रशासनाशी याबाबत सन्मवय साधला आहे. आंदेकर टोळी, तसेच प्रतिस्पर्धी टोळीतील सराईत कारागृहातून साथीदारांशी संपर्क साधत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कारागृहात शिक्षा न झालेले कैदी (न्यायाधीन बंदी – अंडर ट्रायल), तसेच शिक्षा झालेल्या कैद्यांना (कन्व्हिक्टेड) नातेवाईकांची भेट घेण्याची मुभा कारागृह प्रशासनाने दिली आहे. आंदेकर हा नातेवाईकांच्या भेटीगाठी, कारागृहातून न्यायालयात उपस्थित झाल्यानंतर साथीदारांशी संपर्क साधत असल्याची शक्यता आहे.

वनराज आंदेकरचा खून झाल्यानंतर सूड उगविण्यासाठी बंडू आंदेकर टाेळीने आयुष कोमकर याचा नाना पेठेत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला खून केला. त्यानंतर कोंढव्यातील खडी मशीन चौकात आंदेकर खून प्रकरणातील आरोपींना पिस्तूल पुरविणारा आरोपीचा भाऊ गणेश काळे याचा गोळीबार करून खून करण्यात आला. आठवड्यापूर्वी आंदेकर टोळीतील सराइतांनी पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात अक्षय म्हस्केवर गोळीबार केला. या घटनेत म्हस्के बचावला होता.

वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींच्या कुटुंबीयांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर कारागृहातून गुन्हेगारी कारवाया करत आहे. आंदेकरच्या कारवाया रोखणे, टोळीयुद्धाचा बिमोड करण्यासाठी पोलिसांकडून कडक पावले उचलण्यात आली आहे. – अमितेशकुमार, पोलीस आयुक्त.