पुणे : पादचारी महिलेशी अश्लील कृत्य करण्यात आल्याची घटना बाणेर रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वारासह साथीदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वारसह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बाणेर भागात राहायला आहे.

२६ जानेवारी रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास महिला आणि तिची मैत्रीण फिरायला निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार आणि साथीदाराने महिलेशी अश्लील कृत्य केले. महिलेने आरडाओरडा केला. दुचाकीस्वार आणि साथीदार भरधाव वेगात पसार झाले. महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी बाणेर रस्ता परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर तपास करत आहेत. वर्षभरापूर्वी बाणेर, बालेवाडी भागात पादचारी महिलांशी अश्लील कृत्य करण्याची घटना घडल्या होत्या.

महाविद्यालयातील भांडणातून तरुणाला मारहाण

महाविद्यालयात झालेल्या भांडणातून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात घडली. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संघर्ष सुनील सातव (वय २३, रा. बायफ रस्ता, वाघोली, नगर रस्ता) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संघर्ष याचा महाविद्यालायात आरोपींशी वाद झाला होता. महाविद्यालयातील वाद मिटला होता.

गुरुवारी (२९ जानेवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास संघर्ष, त्याचे दोन मित्र वाघोलीतील ‘गेमझोन’ येथे पूल खेळण्यासाठी गेले होते. त्या वेळी आरोपी तेथे आले. संघर्ष आणि त्याचा मित्र प्रेमपुरी याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पूलसाठी वापरल्या जाणाऱ्या काठीने दोघांना बेदम मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार तपास करत आहेत.

कात्रजमध्ये तरुणाचा खुनाचा प्रयत्न

वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना कात्रजमधील संतोषनगर परिसरात घडली. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अजमल अब्दुल नदाफ (वय २०, रा. आशियाना बिल्डींग, अंजनीनगर, कात्रज ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आर्यन काळे, यश बोरकर, शुभम पोगुल यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अब्दुल रहीम नदाफ (वय ४५) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमल नदाफ याची आरोपींशी भांडणे झाली होती. गुरुवारी (२९ जानेवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अजमल हा कात्रजमधील संतोषनगर भागातून निघाला होता. त्या वेळी आरोपींनी अजमला याला अडविले. त्याला शिवीगाळ करुन तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक मुलाणी तपास करत आहेत.