पुणे : बँकाँकहून पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या प्रवाशाकडून केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) पथकाने पाच कोटी ४२ लाख रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. प्रवाशने खेळण्याच्या खोक्यात गांजा लपविल्याचे तपासणीत उघडकीस आले.
आंतराराष्ट्रीय विमानतळावर बँकाँकहून आलेल्या विमानातून एक प्रवासी उतरला. विमानतळाच्या आवारातून तो घाईगडबडीत बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होता. कस्टमच्या पथकाने त्याच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. प्रवाशाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील सामानाची तपासणी करण्यात आली.
तेव्हा त्याच्याकडे असलेल्या सामानात खेळण्याची खोकी सापडली. खेळण्याच्या पाच खोक्यात गांजा ठेवल्याचे तपासणीत उघडकीस आले. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाच कोटी ४२ लाख रुपये असल्याची माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली.
त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ विराेधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली. त्याने गांजा कोठून आणला ?, तसेच तो गांजाची विक्री कोणाला करणार होता ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात बँकाॅकहून ‘हायड्रोपोनिक’ गांजा विक्रीसाठी घेऊन आलेल्या चौघा प्रवाशांना कस्टमच्या पथकाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले.
प्रवाशांकडून सुमारे दहा कोटी रुपयांचा १३ किलो ७२५ ग्रॅम हायड्रोपोनिक’ गांजा जप्त करण्यात आला होता. गेल्या एक ते दोन वर्षांपासून हायड्रोपोनिक गांजाची तस्करी वाढली आहे. नियंत्रित वातावरणात गांजाची लागवड केली जाते. त्यामुळे याला ‘हायड्रोपोनिक गांजा’ असे म्हटले जाते. या गांजाची लागवड बंदिस्त जागेत करण्यात येतेे.

