पुणे : कर्वेनगर भागात एका छायाचित्र स्टुडिओतून महागडा कॅमेरा, ड्रोन चोरून पसार झालेल्या बांगलादेशी चोराला वाराणसीतून अटक करण्यात आली. बांगलादेशी चोरट्याने आंध्र प्रदेश, तेलंगणा, तसेच देशातील प्रमुख शहरात घरफोडीचे ५० गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चोरट्याकडून बांगलादेशी पारपत्र, परदेशी चलन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मोहम्मद बशर नूर मोहम्मद (वय ३८, मूळ रा. ढाका, बांगलादेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या बाबत एका छायाचित्रकाराने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. १४ मार्च राेजी कर्वेनगर भागातील स्टुडिओचा दरवाजा उचकटून महागडा कॅमेरा, ड्रोन कॅमेरा असा सहा लाख ७१ हजाार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता. या गुन्ह्याचा अलंकार पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. पोलिसांनी कर्वेनगरमधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून चोरट्यांचा माग काढण्यास सुुरुवात केली. संशयित चोरटा बुलेटवरून पसार झाल्याचे चित्रीकरणात दिसून आले होते.
आरोपी पुण्यातून पसार झाल्यानंतर बुलेटवरून हैदराबाद, चंद्रपूर, नागपूर, जबलपूर, मिर्झापूरमार्गे उत्तर प्रदेशात गेल्याची माहिती तांत्रिक तपासात मिळाली होती. मोहम्मद वाराणसीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक रवाना झाले. वाराणसी पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. तपासात मोहम्मद हा नेवानाथ विनोद कुमार या नावाने वावरत असल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडून बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले. त्याच्याकडून बांगलादेशी पारपत्र, अमेरिकन डाॅलर, चीन, मलेशिया, सिंगापूर, नेपाळमधील चलन जप्त करण्यात आले.
मोहम्मद बशरविरुद्ध आंध्र प्रदेश आणि तेलंगणात घरफोडीचे ३६ गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात मिळाली. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, उपनिरीक्षक गणेश कदम, महेश निंंबाळकर, जगन्नाथ भोसले, जगदीश तळोले, निशिकांत सावंत, धीरज पवार, सोमेश्वर यादव, राजेश शेळके यांनी ही कारवाई केली.
दहशतवादी संघटनेशी संबंधांबाबत तपास
आरोपी मोहम्मद बशर मूळचा बांगलादेशी आहे. त्याच्याकडून बांगलादेशी पारपत्र जप्त करण्यात आले आहे. मोहम्मद याचा दहशतवादी संघटनेशी संबंध आहे का, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.
