बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या तीन बांगलादेशी तरुणांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. तिघेही वेश्या व्यवसायाशी संबंधित नसले तरी ते या ठिकाणी पारपत्र नसतानाही कसे आले याचा पोलीस शोध घेत आहेत.
मौलन आसीफ मुल्ला (वय २५), रुस्तम मोशियार मोलदार (वय २५), मुनीर दिलावर शेख (वय ३७) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तिघेही मूळचे बांग्लादेशातील राहणारे असून, त्यातील मौलन हा बुधवार पेठेतील शांता बिल्डिंग, रुस्तम हा अली बिल्डिंग, तर मुनीर हा माचिस बिल्डिंग या ठिकाणी राहात असल्याचे आढळून आले. गेल्या काही दिवसांपासून या इमारतीमध्ये ते राहात होते. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पारपत्र आणि व्हिसा आढळून आलेला नाही. त्यांच्यावर विनापारपत्र पुण्यात वास्तव्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवार पेठेतील तीन इमारतींमध्ये बागलादेशी व्यक्ती राहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांनी छापा टाकून तिघांना अटक केली आहे. या तिघांचा वेश्या व्यवसायाशी काही संबंध नाही. मात्र, या ठिकाणी असलेल्या काही महिला या तिघांच्या ओळखीच्या आहेत. त्यामुळे हे तिघे तरुण त्या ठिकाणी वास्तव्याला असावेत, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.