scorecardresearch

बीडमध्ये १२ हजार शेतकऱ्यांची बँक खाती गोठवली; महिन्याभरापासून आर्थिक व्यवहार ठप्प 

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात विविध पिकांसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विमा काढला होता.

(संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता

दत्ता जाधव, लोकसत्ता

पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत ‘बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स’ या खासगी पीकविमा कंपनीच्या तांत्रिक चुकीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कंपनीने चुकून अतिरिक्त १२ कोटी ३५ लाख १३ हजार ३५८ रुपयांची रक्कम १२ हजार ८८३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केल्याचा दावा केला आहे. पैसे जमा झालेल्या सर्व शेतकऱ्यांची बँक खाती कंपनीच्या सूचनेवरून गोठविण्यात आली आहेत. त्यामुळे महिन्याभरापासून शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प आहेत.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात विविध पिकांसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विमा काढला होता. विमा भरपाईपोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतनिधी जमा झाला आहे. तांत्रिक चुकीमुळे १२ हजार ८८३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १२ कोटी ३५ लाख १३ हजार ३५८ रुपयांची अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा झाल्याचे बजाज अलियान्झ कंपनी सांगत आहे. त्यामुळे या कंपनीच्या सूचनेनुसार खासगी, सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांमधील शेतकऱ्यांची बँक खाती महिनाभरापासून गोठवण्यात आली आहेत.

लिंबुटा (ता. परळी वैजनाथ) येथील शेतकरी नारायण दिवटे यांनी बजाज अलियान्झ कंपनीमार्फत पीकविमा काढला होता. या कंपनीकडून त्यांच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या परळी शाखेतील खात्यात २३ हजार ५०० रुपये जमा झाल्याचा संदेश दोन वेळा भ्रमणध्वनीवर आला. त्यानंतर संबंधित बँक खाते गोठवण्यात आले. ‘२३ हजार ५०० रुपयांची रक्कम गोठविणे किंवा तितकीच रक्कम माघारी घेणे, असे पर्याय असतानाही माझे बँक खाते दीड महिन्यांपासून बंद आहे. या खात्यातून कोणताही आर्थिक व्यवहार करता येत नसल्यामुळे रब्बी हंगामासाठी खते, बियाणे खरेदी करताना अडचणी येत आहेत’, अशी व्यथा दिवटे यांनी मांडली.

बजाज अलियान्झ कंपनीच्या तांत्रिक चुकीमुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे बँक खाती तातडीने पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बाबासाहेब जेजुरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड

न्यायालयाच्या आदेशाशिवाय बँकेला खाते गोठविण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम त्यांच्या सहमतीने माघारी घेणे किंवा ती गोठविण्याचा मध्यम मार्ग असताना बँक खातेच गोठविण्याची कृती बेकायदा आहे. 

विद्याधर अनास्कर, ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ

 ‘बजाज अलियान्झच्या चुकीचा फटका

‘बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स’ कंपनीच्या सूचनेवरून शेतकऱ्यांची खाती गोठवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात कंपनीचे व्यवस्थापक अजिंक्य खिर्दीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही, तर ‘तांत्रिक अडचणींमुळे खाती गोठवली आहेत, लवकरच ती पूर्ववत केली जातील’, असे कंपनीच्या हेल्पलाइनवरून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 04:43 IST
ताज्या बातम्या