scorecardresearch

बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून २४ लाखांची रोकड चोरी

बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम गॅस कटरने कापून चोरटय़ांनी २३ लाख ८१ हजारांची रोकड लांबविल्याची घटना पुणे सोलापूर महामार्गावरील यवत परिसरात घडली.

सोलापूर महामार्गावरील यवत गावातील घटना

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम गॅस कटरने कापून चोरटय़ांनी २३ लाख ८१ हजारांची रोकड लांबविल्याची घटना पुणे सोलापूर महामार्गावरील यवत परिसरात घडली. एटीएमच्या परिसरात सुरक्षारक्षक नसल्याचे उघडकीस आले असून मध्यरात्री चोरटय़ांनी एटीएमची तोडफोड करून रोकड लांबविली.  बँकेच्या एटीएमची देखभाल करणाऱ्या कंपनीतील अधिकारी विकास भगत यांनी यासंदर्भात यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुणे सोलापूर महामार्गावर यवत परिसरातील ताज मंजिल इमारतीत बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे. इमारतीच्या तळमजल्यावर बँकेचे एटीएम केंद्र आहे. मध्यरात्री चार चोरटे दुचाकीवरून एटीएम केंद्राजवळ आले. त्यांनी एटीएम केंद्रातील कॅमेऱ्यांवर रंगाचा फवारा (स्प्रे) मारला. त्यानंतर चोरटय़ांनी एटीएमची तोडफोड केली. एटीएममधील २३ लाख ८१ हजार ७०० रुपयांची रोकड लांबविली. एटीएममध्ये ३० लाखांची रोकड होती. सोमवारी (१७ जानेवारी) एटीएमची तोडफोड करून रोकड लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

या घटनेची माहिती मिळताच बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मििलद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी अमृत देशमुख, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी श्वान पथक तसेच अंगुली मुद्रा विभागाचे पथक दाखल झाले. सीसीटीव्ही चित्रीकरणात चार चोरटे आढळून आले आहेत. चोरटय़ांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे तपास करत आहेत.

पोलिसांच्या सूचनांकडे काणाडोळा

पुणे जिल्ह्यातील शिरूर, जुन्नर परिसरात चोरटय़ांनी गोळीबार करून बँकेतील रोकड लुटल्याच्या घटना घडल्या होत्या. मध्यंतरी चाकण भागात चोरटय़ांनी जिलेटिनच्या कांडय़ांचा वापर करून एटीएम केंद्रात स्फोट घडवून आणला होता आणि एटीएममधील रोकड चोरून नेली होती. एटीएम चोरी, बँकांवरील दरोडय़ाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याच्या सूचना ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिल्या आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बँक व्यवस्थापकांशी संवाद साधून त्यांना उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. अनेक बँकांच्या एटीएम केंद्रात सुरक्षारक्षक नाहीत. पोलिसांच्या सुचनांकडे काणाडोळा केल्याने एटीएमची तोडफोड करून रोकड चोरीचे प्रकार सातत्याने घडत आहेत.

पुण्यातही एटीएम तोडफोडीचे प्रकार 

चार दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा आणि खडकी  भागातील दोन बँकांच्या एटीएमची तोडफोड करून चोरटय़ांनी रोकड लांबविण्याचा प्रयत्न केला होता. एटीएम केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, रात्रपाळीत सुरक्षारक्षक नसल्याने चोरटे अशा एटीएम केंद्रात शिरून रोकड चोरीचा प्रयत्न करतात.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bank atm gas cutter steals cash ysh

ताज्या बातम्या